पुणे : दररोज लाखो प्रवाशांचा भार वाहणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मालकीच्या जवळपास निम्म्या बस नियमाप्रमाणे मुदतबाह्य झाल्या आहेत; पण पुरेशा बसअभावी या बस मार्गावर सोडण्याशिवाय प्रशासनापुढे कोणाताच पर्याय नाही. सुमारे ६५० बसचे वयोमान १० वर्षे व त्यापेक्षा अधिक असून, त्यापैकी ८० बसला, तर १५ वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. या बस मार्गावर न सोडल्यास नियमित संचलन कोलमडून जाईल. त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या बसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात मालकीच्या १३७७, तर भाडेतत्त्वावरील ६७८ अशा एकूण २०५५ बस आहेत. मालकीच्या बससाठी संचालक मंडळाने १२ वर्षे किंवा ८ लाख ४० हजार किलोमीटर धाव, असे वयोमान निश्चित केले आहे. त्यापेक्षा अधिक धाव घेतलेल्या किंवा वर्ष उलटलेल्या बस भंगारात काढण्याचे धोरण आहे. पीएमपीचे तत्कालीन प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी हे धोरण ठरविले आहे. त्यापूर्वी नियमानुसार बसचे वयोमान १० वर्षे किंवा ७ लाख किलोमीटर धाव, असे होते; पण ताफ्यातील बसची स्थिती आणि नव्याने बसखरेदी होत नसल्याने डॉ. परदेशी यांना हा निर्णय घ्यावा लागला होता, असे अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे पूर्वीच्या नियमाचा आधार घेतल्यास सध्या पीएमपीच्या मालकीच्या ६४८ बस मुदतबाह्य ठरतात, तर सध्याचा नियम लावल्यास हा आकडा जवळपास निम्मा आहे.
मालकीच्या १४८ बस १२ वर्षांपुढील आहेत, तर १८० बस ११ ते १२ वर्षांच्या आणि ३२० बस ९ ते १० वर्षांच्या आहेत. केवळ २१८ बस पाच वर्षांच्या आतील आहेत; तसेच भाडेतत्त्वावरील बसही मागील पाच ते सहा वर्षांपूर्वीच्या आहेत. पीएमपीला २०१२ मध्ये २६६ बसची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने २०१५ मध्ये दिलेल्या १० बस वगळता मार्च २०१८ पर्यंत बसखरेदी झाली नाही. त्यामुळे जुन्याच बसवर गाडा ओढावा लागत होता. मागील वर्षी २०० मिडी बस आल्या, तर यावर्षी ६ तेजस्विनी व २५ इलेक्ट्रिक बस मिळाल्या. ई-बस मालकीच्या नसून स्मार्ट सिटीअंतर्गत भाडेतत्त्वावर मिळाल्या आहेत.पुढील वर्षात एक हजार बस ताफ्यात...1मागील वर्षभरात ‘पीएमपी’ला २०६ नवीन बस मिळाल्या आहेत. पुढील वर्षभरात आणखी जवळपास एक हजार बस ताफ्यात येणार आहेत. त्यामुळे टप्पाटप्प्याने जुन्या बस भंगारात काढण्याचे धोरण पीएमपी प्रशासनाने निश्चित केले आहे.2या बस येईपर्यंत जुन्या बसवरच अवलंबून राहावे लागते. त्यासाठी बसच्या देखभाल-दुरुस्तीवर मोठा खर्च होणार आहे. खिळखिळ्या व सतत ब्रेकडाऊन होणाºया बसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागेल.