पराग कुंकूलोळ, चिंचवडघरामध्ये सध्या अठरा विश्वे दारिद्र्य नांदत आहे. तिचा धनी आणि दोन लेकरांचा बाप काळ्या मातीच्या कुशीमध्ये गुडुप झाला. ६० हजारांचं कर्ज, पण तेही डोंगराएवढं वाटू लागल्यानं हतबल शेतकऱ्याने स्वत:ची जीवनयात्रा संपविली हे कुटुंब अक्षरश: उघड्यावर आले. तरीही ती नेटानं संसाराचा गाडा ओढण्याची जिद्द तिने सोडलेली नाही. तिला समाजाच्या पाठबळाची नितांत आवश्यकता आहे.सुरेश आनंदा पाटील (वय ३८) चोपडा तालुक्यातील अकुळखेडा हे गाव. यांनी १६ आॅगस्ट रोजी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली. पाटील यांच्या पत्नी विद्या सुरेश पाटील (३५) या धक्क्यातून अजूनही सावरल्या नाहीत. विशाल व जय या दोन मुलांसह त्या सध्या आकुर्डीतील गुरुदेवनगरामधील सुतारवाडा चाळीत राहत आहेत. मुलांचे पुढील शिक्षण पूर्ण व्हावे, यासाठी त्यांची मोलमजुरी सुरू आहे. या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेनंतर पंचनामे झाले. अनेकांनी सांत्वनही केले. आश्वासनांची खैरात झाली. मात्र, प्रत्यक्षात मदतीचा हात कोणीच दिला नाही. गावाकडे पोटाची भूक भागत नाही, म्हणून हे कुटुंब शहरात आले. उद्योगनगरी असा नावलौकिक मिळविणाऱ्या पिंपरी-चिंंचवडमध्येही या कुटुंबाच्या पदरी उपेक्षाच आली. कधी मोलमजुरी मिळायची, तर कधी नाही. म्हणून तिच्या धन्यानं गावचा रस्ता धरला. गड्या आपली शेतीच बरी, म्हणून शेती करू लागला. पण, तेथेही दुर्दैव आडवं आलं. दुष्काळाच्या झळांनी त्याचा गळा गोठायला सुरुवात केली. दुष्काळ परिस्थिती, कर्जाचे ओझे यांमुळे शेती या शब्दाची भीती वाटत असल्याच्या भावना पाटील कुटुंबीयांच्या मनात घर करून आहे. कितीही संकटे आली, तरीही न डगमगता या माऊलीची धडपड सुरूच आहे. एका चपाती केंद्रात त्या चपात्या लाटण्याचे काम करीत आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह सुरू आहे. जय दहावीत शिक्षण घेत असून, विशाल हा आयटीआय झाला आहे. आता तो नोकरीच्या शोधात आहे. घरचा कर्ता करविता गेल्याने या कुटुंबाची परवड सुरू आहे.
अर्ध्यावरती डाव मोडला पण... सोडली नाही जिद्द!
By admin | Published: October 03, 2015 1:23 AM