पुणे : रसिकांना पोट धरून हसवणारे विनोदोत्तम करंडक ‘हॅलो इन्स्पेक्टर’ने जिंकले आहे. या एकांकिकेचे लेखन, अभिनय, नेपथ्य, संगीत अफलातून होते. त्यामुळे करंडकावर त्यांचे नाव कोरले गेले. पारितोषिक स्वीकारल्यानंतर संघाने एकच जल्लोष केला.
विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा मनोहर कोलते पुरस्कृत दादा कोंडके स्मरणार्थ करंडक आयोजित केला होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या ‘हॅलो इन्स्पेक्टर’ला प्रशस्तीपत्र आणि १५,००० हजार रूपये पारितोषिक देण्यात आले.
अहमदनगर येथील न्यू आटर्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या 'नाना थोडं थांबा ना !!!' या एकांकिकेला अमर राजपूत पुरस्कृत कुसुम राजपूत स्मरणार्थ करंडक, प्रशस्तीपत्र आणि रु.१२,००० हे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तर अजय नागनूर पुरस्कृत श्रीरंग नागनूर स्मरणार्थ करंडक, प्रशस्तीपत्र आणि रु.१०,००० हे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अथांग कलामंडळच्या 'नाटक' या एकांकिकेने पटकावले.
प्रसिद्ध लेखक आणि अत्रे साहित्याचे अभ्यासक प्रा. श्याम भुर्के आणि महावितरण, पुणेचे मुख्य अभियंता, राजेंद्र पवार यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली. यावेळी भाडिपा फेम प्रसिध्द अभिनेत्री रेणुका दफत्तरदार, प्रसिद्ध अभिनेते आशुतोष वाडेकर आणि प्रसिध्द एकपात्री कलाकार संतोष चोरडीया यांना ‘विनोदवीर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे संस्थापक- अध्यक्ष हेमंत नगरकर, संस्थापक- अध्यक्ष मनोहर कोलते, सचिव राजीव पुणेकर, उपसचिव अमित काळे, खजिनदार अमर राजपूत, अनिता कामथे, शैलेंद्र भालेराव, तन्मय धायरकर आदी उपस्थित होते.
यावेळी रंगमंचाची विविध रूपाने दीर्घकाळ सेवा केल्या बद्दल नेपथ्यकार उमेश संत, रंगमंचीय व्यवस्था पाहणारे मंदार बापट आणि प्रसिध्द प्रकाशक आणि वितरक परेश एजन्सीचे अनिरुध्द भाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा भरत नाट्य मंदिरात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रासह हैद्राबाद येथून एकूण ३८ संघ यंदा या स्पर्धेत भाग झाले होते.