पुणे : हमीद दलवाई यांनी १९६६ मध्ये मोजक्या महिलांना सोबत घेऊन न्याय, हक्कांसाठी लढा उभा केला. ते काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे होते. पूर्वीच्या काळातील मुस्लीम समाजाला त्यांचे विचार पटले नाहीत. त्यामुळे त्यांना समाजातून विरोध सहन करावा लागला. तरीही, हमीद दलवाई यांनी त्यांनी धर्मातील चुकीच्या गोष्टींना नेटाने विरोध केला. मुलभूत अधिकारांच्या मागणीसाठी मोर्चा घेऊन ते मंत्रालयावर धडकले. त्यांचे विचार पुरोगामी आणि कृतीशील होते. तिहेरी तलाक कायदाच्या प्रक्रियेमध्ये हमीद दलवाई यांचे योगदान नाकारता येणार नाही. दलवाई यांच्याबाबत सर्वसामान्यांना फारशी माहिती नाही. त्यांचे योगदान दुर्लक्षित राहिले आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी व्यक्त केली.
मुस्लिम समाजाच्या उत्थानासाठी लढा उभारणारे, संघटनेच्या माध्यमातून समानतेचे, सामाजिक सुधारणेचे, धर्मनितपेक्षतेचे बीज पेरणारे हमीद दलवाई यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणा-या ‘हमीद : द अनसंग ह्यूमॅनिस्ट’ या लघुपटाचे प्रदर्शन रविवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात करण्यात आले. यावेळी नसीरुद्दीन शहा यांच्यासह ज्योती सुभाष, अमृता सुभाष उपस्थित होत्या.
शहा म्हणाले, ‘ज्योती सुभाष यांनी माहितीपटाबाबत कल्पना दिल्यावर मी हमीदभार्इंचे साहित्य वाचले. भारतातील मुस्लिमांचे राजकारण आणि इंधन ही पुस्तके माझ्या वाचनात आली. त्यांचे विचार आणि कार्याचा परीघ पाहून मी भारावून गेलो. त्यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते. दुर्देवाने त्यांना कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अत्यंत कमी आयुष्य लाभले, याचे शल्य वाटते. आजच्या काळात त्यांच्या विचारांचा जागर करण्याची आणि तरुण पिढीपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’
या लघुचित्रफितीच्या लेखिका, दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांनी लहानपणी हमीद दलवाई यांना बघितल्याचे सांगितले. मात्र महाराष्ट्र फौंडेशनने दिलेल्या पुरस्कारानंतर मी पुन्हा त्यांचे चरित्र पुन्हा एकदा वाचले आणि मला ते सर्वांना समजावे असे वाटले. दलवाई माणूस म्हणून इतके मोठे होते की नसीरुद्दीन शाहांसारख्या माणसाला या कामात सहभागी व्हावेसे वाटले. अभिनेत्री अमृता सुभाष म्हणाल्या, ‘दलवाई कायम उत्साहाने रसरसलेले असायचे असे सांगितले जाते. त्यांच्यासारखा मनस्वी माणूस एकदा प्रत्यक्षात बघायला मिळायला हवा होता असे अनेकदा वाटते. त्यामुळे ही लघुचित्रफीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची इच्छा आहे.’ हमीद दाभोलकर म्हणाले, ‘ही लघुचित्रफीत खूप आधी व्हायला हवी होती. दलवाई यांच्या नावावावरून माझे नाव ठेवण्यात आले, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सामाजिक प्रश्न हाताळण्याची त्यांची शैली कायम भुरळ घालणारी वाटते.