पुणे : शहरातील हाॅटेल, बार आणि पबमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे ड्रग्स आणि मद्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने कोरेगाव पार्क, बाणेर , बालेवाडी भागातील अनाधिकृत बांधकाम केलेल्या १९ रेस्टॉरंट, बार, रुफटॉप हॉटेलवर कारवाई केली. त्यामध्ये ५६ हजार ६१ चौरस फुटाचे बांधकामावर बुलडोझर फिरविण्यात आला होता.
गेल्या महिन्यात कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टाॅप हाॅटेल, हाॅटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईत सुमारे १४४ हाॅटेलवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई थंडावली होती. त्यानंतर एल ३ पबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरु असल्याचे समोर आले. तेथे अंमलीपदार्थांचे सेवनही करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर पुण्यात खुलेआम ड्रग्ज पार्टी होत असल्याचे समोर आल्याने राज्य सरकारची डोकेदुखी वाढली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेने कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी बाणेर, खराडी, औंध, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर या भागात अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने जोरदार कारवाई केली. त् महापालिकेने मंगळवारी २९ ठिकाणी कारवाई करून ३६ हजार ८४५ चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले. त्यानंतर आज १९ ठिकाणी कारवाई करून रेस्टॉरंट, बारचे ५० हजार ६१ चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले.
हे आहेत कारवाई झालेले रेस्टॉरंट
बाणेर द कार्नर लाऊंज बार ३हजार चौरस फुट, एमएल सिटोबार१२ हजार चौरस फुट , ईस्को बार ८ हजार चौरस फुट, इलीफ्ट बार १ हजार चौरस फुट, ब्रीव्ह मर्चंट कॅफे १ हजार ५००, उरबो किचन बार ३ हजार चौरस फुट , नेटीव बार २ हजार चौरस फुट, द ज्यॉईस बॉय ८०० चौरस फुट , फिलेमिट बार ३ हजार २०० चौरस फुट , थ्रीमिस्टेक टर्स ६०० चौरस फुट , बालेवाडी डॉक यार्ड २हजार ४०० चौरस फुट.
कोरेगाव पार्क ग्रेडमामस २ हजार चौरस फुट , दबाबा शाब २२३ चौरस चौरस फुट , प्रिम रेस्टॉरंट ८ हजार ४०० चौरस फुट , टेल्ली बार ६८८ चौरस फुट , शिवाजीनगर सोशल हॉटेल एफसी रोड ४ हजार २७५ चौरस फुट, हडपसर , सासवड रोड १ हजार चौरस फुट ठिकाणी कारवाई करून ५६ हजार ६१ चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले.
माहिती असुनही आम्हाला कारवाई करता येत नाही
शहरातील बडे उद्योगपती, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी शहरात अनधिकृत बांधकामे करून हॉटेल, रेस्टॉरंट, पब सुर केले आहेत. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने तेथे बिनधास्तपणे पहाटेपर्यंत दारूविक्री केली जात आहे. तेथे कारवाईसाठी गेले की अनेक मोठे नेते फोन करून कारवाई थांबविण्यास सांगतात. आमच्यावर दबाव आणतात. अनेक ठिकाणी कारवाई करता आली नाही, तेथे केली त्यातील काही ठिकाणी अर्धवटच कारवाई झाली. त्यामुळे माहिती असूनही बांधकाम पाडता येत नाही. आमचे हात बांधले गेलेले असतात. मात्र, अशा घटना घडल्यानंतर आम्हाला कारवाई करण्याची मोकळीक मिळते. त्यामुळे जोरदार कारवाई सुरू आहे.