पिंपरी, रहाटणी : पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने गुरुवारी अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम राबविली. या अंतर्गत महापालिकेकडून १८ आणि प्राधिकरणाकडून एका बांधकामावर बुलडोझर फिरविण्यात आला. कारवाईला विरोध दर्शविण्यासाठी रहाटणी फाटा येथे दोन बसवर दगडफेक करण्यात आली, तर स्थानिक महिलांनी रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कडेकोट बंदोबस्तामध्ये कारवाई पूर्ण केली.काही दिवसांपासून थंडावलेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुन्हा एकदा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राधिकरणाने केलेल्या कारवाईत थेरगावातील सर्व्हे क्रमांक १२/१९, २० मधील अशोक आजनानी यांची पाचमजली इमारत पाडण्यात आली. २०१२ मध्ये कारवाई करून ही इमारत अर्धवट पाडली होती. हे अर्धवट बांधकाम आजनानी यांनी स्वत:हून पाडून घ्यावी याबाबत त्यांना अनेक वेळा कळविण्यात आले. वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांनी दखल न घेतल्यामुळे गुरुवारी पुन्हा त्यावर कारवाई करण्यात आली. शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्यासाठी आणि विकासकामांसाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी अनिल दुधलवार यांनी सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नुरमोहम्मद शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे, पोलीस उपनिरीक्षक आर. के. माळजकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सविता घनवट यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षक, २५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, आपल्या घरांवरही कारवाई होणार असल्याचे समजल्याने ४० ते ५० जण रहाटणी, श्रीनगर येथील धनगरबाबा मंदिराजवळ जमा झाले. या जमावाने येथील बीआरटीएस रस्त्यावरील दोन बसच्या काचा फोडल्या. महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता सुनील वाघुंडे यांच्या पथकाने मामुर्डी येथील ८५० चौरस फुटांवरील बांधकाम हटविले. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळे गुरव येथील दहा हजार ८०० चौरस फूट क्षेत्रफळावर बांधण्यात आलेली एक इमारत व चार पत्राशेड पाडण्यात आले. राहुल सिंघवी (रा. गल्ली क्र. ३ मोरया पार्क , पिंपळे गुरव) यांच्या मालकीची आरसीसी पार्किंगसह चार मजली ३२०० चौरस फुटांची इमारत भुईसपाट करण्यात आली . सिल्विया फेलिक्स (रा. गल्ली क्र. ३ मोरया पार्क पिंपळे गुरव) यांच्या मालकीचे ५००० चौरस फुटांचे पत्राशेड हटविले. ओतमा वर्गिस ( रा. शिवरामनगर पिंपळे गुरव) यांचे १५०० चौरस फुटांचे पत्राशेड तर मनीष राठी (रा. गल्ली क्र. ३ मोरया पार्क, पिंपळे गुरव) यांच्या मालकीचे पाचव्या मजल्यावरील ११०० चौरस फुटांचे पत्राशेड हटविण्यात आले. ही कारवाई कार्यकारी अभियंता गुलाब दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता दिलीप सोनवणे, रामनाथ टकले, कनिष्ठ अभियंता विजय सोनवणे यांनी केली. दोन बुलडोझर, डंपर आणि चार मजुरांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. (प्रतिनिधी)राजकारण्यांवर नागरिक संतप्तराज्य शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी बांधकामांवर कारवाई होणार नसल्याचे आश्वासन देत नागरिकांना भ्रमात ठेवले. मात्र कारवाई सुरू झाल्याने नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे चित्र थेरगाव येथे दिसून आले. संतापलेल्या नागरिकांनी दगडफेक केली. शहरात सध्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण व महानगरपालिका यांच्या वतीने थेरगाव, तसेच पालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांत कारवाई करून अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली. चौघांवर गुन्हा दाखलगुरुवारी दिवसभरात १८ बांधकामांवर बुलडोझर फिरवून २३ हजार ४१७ चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. पोलिसांनी काही महिलांना ताब्यात घेतले आहे. नंतर त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, बसच्या काचा फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी महापालिका परिसरातील दहा अनधिकृत अतिक्रमण विरोधी पथकाने बांधकामांवर कारवाई करण्यात आली.अनधिकृत बांधकामांवरील कारवाईदरम्यान कारवाईला विरोध करण्यासाठी काही महिला रस्त्यावर जमा झाल्या होत्या. जमावातील काही जणांनी बसवर दगड मारले. मात्र, कडेकोट बंदोबस्त असल्याने कारवाई सुरू ठेवण्यात आली. दरम्यान, सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात चार व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. - नुरमोहम्मद शेख,वरिष्ठ पोलीस निरीक्षक