पुणे : शहरातील अनधिकृत बांधकामांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी राज्यशासनाच्या आदेशानुसार, महापालिकेने पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांची माहिती संकलित करण्यात आली असून, त्याच्या अंतिम याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांकडून बंदोबस्त उपलब्ध झाल्यावर, ही अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.गेल्या काही वर्षांपासून शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढलेली आहेत. मात्र, महापालिकेकडून वारंवार कर्मचारी नसणे, पोलीस बंदोबस्त मिळत नाही अशी कारणे दाखवत; तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी तळजाई पठारावर अनधिकृत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर महापालिकेने शहरात अशा इमारतींवर जोरदार कारवाई सुरू केली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच बांधकामांची ही कारवाई थंडावली होती. मात्र, काही आठवड्यांपूर्वी महापालिका हद्दीजवळ नऱ्हे इथे इमारत कोसळल्यानंतर, या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत कुमार यांना विचारणा केली असता, त्यांनी लवकरच अनधिकृत इमारतींवर कारवाई पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)