---
वाल्हे : पुरंदर तालुक्यात लसीकरणाचा वेग मागील आठवड्यापासून मंदावला आहे. वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील आठवड्यात सोमवार (दि. १९) रोजी लसीकरण झाले होते. यानंतर लसीअभावी आरोग्य केंद्रात लसीकरण बंद होते. सोमवारी लसीकरण केंद्रावर लस येणार असल्याचे कळताच, नागरिकांनी सकाळी सहापासून गर्दी केली होती. मात्र, शंभरच लस उपलब्ध झाल्याने नागरिकांनी नंबर लावण्यासाठी हमरीतुमरी केली व केंद्रावर एकच गोंधळ उडाला.
मात्र लसीकरण केंद्रावर लस फक्त १०० नागरिकापुरतीच उपलब्ध झाल्याने, आपला क्रमांक पहिला लागला पाहिजे, नाहीतर १०० लाभार्थ्यांमध्येतरी आपला नंबर यावा, यामुळे सकाळी नऊपर्यंत केंद्रावर तोबा गर्दी झाली. गर्दी झाल्याने आपल्या क्रमांकांवर नागरिक हमरीतुमरीवर आले. गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढल्याने पोलीस यंत्रणेला यावे लागले.
कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एकमेव अस्त्र म्हणजे कोरोना लसीकरण करून घेणे होय. याची जाणीव नागरिकांना झाल्याने नागरिक वाट्टेल त्याठिकाणच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करताहेत. मात्र, लसीकरण केंद्रावर लसींचा साठा कमी उपलब्ध होत असल्याने काही केंद्रे लवकर बंद होत आहे. तर काही केंद्रे सुरूच होत नाही. अशात लस आल्याचे कळताच त्या केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे.
वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत राख, नावळी, जेऊर, पिसुर्टी, आडाचीवाडी, हरणी, पिंगोरी, वागदरवाडी, सुकलवाडी, दौंड आदी गावे येतात.
--
वाल्हे गावातील लसीकरणासाठी एकूण लाभार्थी २१ हजार ६२९ असून, यापैकी सोमवारपर्यंत (२६ जुलै) ८ हजार ३४ नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. दुसरा डोससाठी २ हजार ३९९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती पर्यवेक्षक राजेंद्र दळवी, आरोग्य सहाय्यक तानाजी मेटकरी यांनी दिली.
--
फोटो क्रमांक : २६ वाल्हे लसीकरण केंद्र
फोटो ओळ. वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाला झालेली गर्दी. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.