पुणे : सरकार पूजा चव्हाण प्रकरणातील संबंधित मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओ क्लिप, फोटो, मोबाइल, लॅपटॉप या माध्यमातून सर्व काही उघड असतानाही पोलिसांनी या मंत्र्याला एकदाही विचारले नाही. त्यामुळे महाराष्ट्रतील तपास यंत्रणेवर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना जमत नसेल. तर त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी मागणी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली.
मेटे म्हणाले, सामान्य माणूस कधीही १५ दिवस लपून राहत नाही. गुन्हेगार मात्र नेहमी लपून बसतात. पूजा चव्हाणची हत्या झाली की आत्महत्या हे लोकांना माहीत आहे. सरकारने त्या मंत्र्याला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे. अशा वेळी या मंत्र्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यावा. त्या मुलीचेही कुटुंबीय दबावात आहेत. त्यांच्यापैकी कोणीही फिर्याद दाखल करण्यास घरातून बाहेर येत नाहीत. आम्ही त्या कुटुंबीयांना भेटायला गेलो. तर आमच्याबाबत आगळेवेगळे वक्तव्य केले जाईल. शिवसेनेच्या बाळासाहेबांचे विचार उद्धव यांनी बाजूला ठेवले आहेत. त्यांनी आघाडीच्या सानिध्यातील लोकांना साथ देऊ नये. हा छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे अशा व्यक्तींचा महाराष्ट्र आहे.
चौकट
मराठा अरक्षण अंतिम सुनावणी ८ ते १८ मार्चच्या दरम्यान
मराठा समाजाच्या अरक्षणाबाबत ते म्हणाले, सरकारच्या अट्टहासाने मराठा समाजाच्या मुलांचे नुकसान होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. आरक्षणाचा निर्णय होण्याअगोदरच सरकारने नोकर भरती व राज्यसेवेच्या परीक्षांच्या तारखा निश्चितीचा धडाका लावला आहे. सरकारच्या या अट्टहासाने मराठा समाजाच्या मुलामुलींना नोकरीपासून वंचित राहवे लागेल. सर्वोच्च न्यायालयाची अंतिम सुनावणी ८ ते १८ मार्चच्या दरम्यान होणार आहे. आमच्या अंदाजाप्रमाणे मार्च अखेरपर्यंत न्यायालय निकाल देईल. आतापासून ४० ते ४५ दिवस परीक्षा आणि भरती पुढे ढकलल्यावर कोणाचेही नुकसान होणार नाही. राज्यातील परीक्षा आणि नोकरभरती पुढे ढकलावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
चौकट
आरोग्य खात्याची परीक्षा पुढे ढकला
राजेश टोपे यांनी आरोग्य खात्याची परीक्षेची तारीख २८ फेब्रुवारी जाहीर केली आहे. काही खात्याच्या व एमपीएससीच्या परीक्षा मार्चमध्येच आहेत. या सर्व परीक्षा आणि भरती एक महिना पुढे ढकलाव्यात, असेही त्यांनी सांगितले.