राजगुरुनगर (पुणे) : राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीतील राक्षेवाडी, साईनगर येथे होणारा पिण्याचा पाणीपुरवठा एक महिन्यापासून खंडित झाल्याने येथील संतप्त महिलांनी नगरपरिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
राक्षेवाडी ,साईनगर या परिसरांत नगरपरिषदेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा होत नाही. अनेक वेळा मागणी करूनही, वेळोवेळी निवेदन देऊनही कुठलीही दखल नगरपरिषदेने घेतली नाही. या परिसरातील नगरपरिषदेचे कर्मचारी पाणी सोडण्यास टाळाटाळ करतात. कोट्यवधी रुपये खर्चून नवीन पाणी योजनेचे पाणी अजूनही येत नाही. नगर परिषदेच्या कारभाराला वैतागून संतप्त झालेल्या महिलांनी या भागातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या विभागप्रमुख अर्चना सांडभोर नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढत नगरपरिषदेच्या कार्यालयात हे आंदोलन केले.
आंदोलकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. गेल्या एक महिन्यापासून या परिसरात पाणी नाही. विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्यासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे. आमचा खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी श्रीकांत लोळगे यांनी आंदोलनकर्त्या महिलांना दिले. यावेळी अरुणा घुले, मीरा कराळे शारदा सांडभोर, अर्चना तांबे, रूपाली पवार, निकिता साकोरे, तेजस्विनी पाटील, शांताबाई काळे, वैशाली वाडेकर, लक्ष्मी सांडभोर, चंद्रकला गोसावी यांच्यासह दिनेश सांडभोर, माणिक होरे, नंदू सांडभोर, सुदाम कराळे, बापू सांडभोर यावेळी उपस्थित होते.