लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीगर ते स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे सिव्हिल कोर्ट स्थानकापासूनचे खोदकाम सोमवारी (दि.१५) पुढे सुरू झाले. लवकरच हे भुयार मुठा नदीच्या खालून पुढे कसबा पेठेपर्यंत नेण्यात येईल. नदीच्या खालून साधारण २० मीटर खोलीवर भुयार असून त्यातून मेट्रो धावणार आहे.
शिवाजीनगरपासून सिव्हिल कोर्टपर्यंतचे भुयार आता पूर्ण झाले आहे. सिव्हिल कोर्टजवळ मेट्रोचे भुयारी स्थानक आहे. प्रत्येक स्थानकात मेट्रोचे दोन्ही (जाणारा व येणारा) बोगदे एकत्र होतात. सिव्हिल कोर्ट स्थानकाचा पाया घेण्याचे काम सुरू असल्याने पुढचे खोदकाम थांबवण्यात आले होते. स्थानकाचा पाया तयार झाल्याने आता टनेल बोअरिंग मशिन (टीबीएम) पुढे नेण्यात येत असल्याचे ‘महामेट्रो’ने सांगितले.
सिव्हिल कोर्टानंतर पुढचे स्थानक कसबा पेठेत फडके हौदाच्या मागील जागेत आहे. सिव्हिल कोर्ट ते नदीपर्यंतचे अंतर साधारण ५०० मीटर आहे. टीबीएम दररोज १० मीटरपर्यंत खोदकाम करते. सध्या ८ मीटर खोदकाम केले जात आहे. नदीखालून जाताना ही गती आणखी कमी होईल. त्यानंतरही कसबा पेठ, मंडई असा भाग असल्याने तिथेही खोदकामाचा वेग कमी असेल. खोदकामाआधी महामेट्रोने या संपूर्ण परिसराची भौगोलिक माहिती व भूगर्भ चाचणी घेतली आहे. कोणत्याही इमारतीचा पाया इतका खोल नसल्याने एकाही इमारतीला या खोदकामाचा धोका पोहचणार नसल्याचो महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान शिवाजीनगरपासून सुरू झालेला बोगद्याला आतील बाजूने कॉंक्रिटच्या रिंगा बसवून झाल्या आहे. त्यात रूळ टाकण्याचे काम सुरू आहे.
चौकट
“खोदकामात पूर्ण काळजी घेतली जात असल्यानेच मशिनची गती कमी केली आहे. स्वारगेटकडून होत असलेले भुयार मंडईत येईल व सिव्हिल कोर्टकडून पुढे जाणारे भुयार नदीखालून मंडईपर्यंत जाईल. तिथे स्थानक असल्याने दोन्ही भुयारे एकत्र होतील. टीबीएमचे भाग सुटे करून तिथूनच ते वर घेतले जाईल.”
-अतुल गाडगीळ, संचालक (प्रकल्प), महामेट्रो