पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंगच्या मागील रस्त्यावर एक हँण्ड ग्रेनेड सदृश्य वस्तु आढळल्याने खळबळ उडाली. पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या चार तासांच्या प्रयत्नानंतर ही वस्तु निकामी करण्यात आली. यानंतर लष्कराला याविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे. तसेच बॉम्ब सदृश्य वस्तुचे अंश पुढील तपासणीकरिता फॉरेन्सिक लँबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
रेल्वे प्रशासनाचे मुख्य कार्यालय ताडीवाला रस्त्यावर असून त्याच्या शेजारीच रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाण्याकरिता पादचारी उडडाणपूलाची व्यवस्था आहे. त्या पुलाशेजारी असलेल्या पार्किंगच्या मागील रस्त्यावर साफसफाई करणा-या कर्मचा-याला हॅण्ड ग्रेनेड सदृश्य वस्तु आढळली. त्याने तातडीने त्याची माहिती रेल्वे प्रशासनाला कळविली. यानंतर रेल्वे सुरक्षा बलचे संतोष बडे आणि कॉन्स्टेबल विकास पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्वान पथक व पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनास्थळी बंडगार्डन पोलिस व बीडीडीएस पथक दाखल झाले. त्यांनी परिसराची नाकाबंदी करुन पाहणी केली असता त्यांना हँंड ग्रेनेड सदृश्य वस्तु आढळुन आली. संबंधित वस्तु धोकादायक असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी ती वस्तु रेल्वेच्या मोकळया मैदानात हलवून तिचा स्फोट घडवून नष्ट केली. त्या वस्तुचे नमुने गोळा करुन पुढील तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी पाहणी केली.