पुणे : महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर चढाई ही धडधाकट माणसांनाही घाम फोडणारी आहे. दिव्यांगांमध्ये ऊर्जा पेरण्यासाठी ‘शिवुर्जा’ प्रतिष्ठानकडून दरवर्षी नववर्ष दिनी राज्यातील दिव्यांगांना घेऊन कळसुबाई शिखर सर केले जाते. यंदा मोहिमेचे दहावे वर्ष होते. राज्यातील पुणे, बीड, अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, नाशिक, मुंबई, ठाणे, जालना आदी जिल्ह्यातून ५५ दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. यामध्ये सात महिलांचा सहभाग होता. दिव्यांगाची दहावी कळसुबाई मोहीम शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वात यशस्वी व सुरक्षितपणे पार पडली. शिवुर्जा प्रतिष्ठानकडून लावलेल्या माहिती फलकाचे प्रायोजकत्व डॉ. अनिल बारकुल यांचे आहे.
एका पायाने कळसुबाई शिखर केले सर
महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या रोजगारांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी धर्मेंद्र सातव यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर सलग साडेचार तास एका पायाने चढले. दिव्यांगांना नैसर्गिक व्यंगावरून खाजगी क्षेत्रात कोणीही रोजगार नाकारू नये. मनुष्य शरीराने नाहीतर कर्तुत्ववान श्रेष्ठ ठरतो. दिव्यांगामध्ये असलेल्या कौशल्याचा विचार करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायला हवी, अशी मागणी धर्मेंद्र सातव यांनी कळसुबाई शिखर सर करून राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.