शिवानी खोरगडे
पुणे: कात्रजच्या एका चाळीत दहा बाय बाराच्या घरात राहणारी दिक्षा काहीच दिवसात परदेशी जाणार आहे. ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठीत चेवनिंग स्कॉलरशिपची ती मानकरी ठरलीये. गर्ल ऑन 'विंगचेअर' आणि ‘मोटीवेशनल स्पीकर' म्हणून दिक्षाची ओळख आहे. भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील ज्या ७५ मुलांची या स्कॉलरशिपसाठी निवड झाली आहे. त्यात पुण्यातली दीक्षा दिंडे हिचाही समावेश आहे. दिक्षा ही दिव्यांग आहे, पण तिच्या कामाची भरारी खूप उंच आहे.
ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित समजली जाणारी 'चेवनिंग स्कॉलरशिप' ही अशा मुलांना मिळते ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचंय. ज्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी आहेत. अशा मुलांसाठी ही स्कॉलरशिप दिली जाते. यंदाच्या वर्षी १६० देशांमधून ६८ हजार मुलांनी या स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता. त्यात दीड हजार मुलांची निवड झाली. त्यातील दीक्षा ही एक आहे. पुण्यातील कात्रज येथील सोनवणे चाळीत दहा बाय बाराच्या घरात राहणारी दीक्षा जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले आहे. ८४ टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या यामुळे इतर दिव्यांगांप्रमाणे तिच्या हालचालींवर मर्यादा येतात. पण असं असताना महत्त्वाकांक्षा, जिद्द, हुशारीच्या बळावर आकाशाला गवसणी घालण्याच्या तिच्या स्वप्नांना कोणी रोखू शकलं नाही. अपंगत्वामुळे खासगी शाळेने प्रवेश नाकारलेल्या दिक्षा दिंडे हिला आज जगभरातल्या महत्त्वाच्या चर्चासत्रांसाठी सन्मानाने ‘मोटीवेशनल स्पीकर' म्हणून बोलावलं जातं. व्हीलचेअरशिवाय फिरता न येणारी दिक्षा आज उच्च शिक्षण, नोकरी आणि तिचं सामाजिक काम यामुळे अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.
कॉलेजच्या सहलीत दिव्यांगत्वामुळे दिक्षाला डावलण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर तिने जगभर फिरण्याचा निर्णय घेतला. ती स्वत:ला 'गर्ल ऑन व्हील्स' नाही तर 'गर्ल ऑन विग्ज' म्हणते. दिक्षा हा आत्मविश्वास तिला आज नवी भरारी देतोय. लवकरच ती लंडनच्या विद्यापीठात आपल्या पुढील शिक्षणासाठी जाणार आहे.
सर्व श्रेय माझ्या आईला
माझ्या यशात आज पर्यंत माझ्या अनेक सुख दुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभी असलेली माझ्या आई ने माझ्यासाठी खूप मेहेनत घेतली. अनेकांनी लहान पणापासून माझ्या आईला अनेक सल्ले दिले की तिला स्पेशल शाळेत टाका. वसतिगृहात टाका पण माझ्या आईने माझ्या साठी खूप मेहेनत घेतली. आणि मला शिकवलं. आज पुणे महापालिका कात्रजमधून सुरू झालेला प्रवास ब्रायटेनमध्ये पोहचला आहे. याचा सर्व श्रेय माझ्या आईला जाते. अस देखील यावेळी दीक्षा दिंडे हिने सांगितले.