पुणे : अपंग मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरूकरणे, अपंगांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आयुक्तालयाचे बळकटीकरण करणे, अपंगांसाठी परदेशी शिष्यवृत्ती देणे, बहुविकलांगांसाठी आधारगृह तयार करणे, अशा विविध १८ कल्याणकारी योजना अपंग कल्याण आयुक्तालयाने सरकारला दोन वर्षांपूर्वी सादर केल्या होत्या. मात्र यातील १७ योजना कागदावरच राहिल्या आहेत. राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग, मानसिक आजार, बहुविकलांग अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींची संख्या सुमारे २९ लाख ६४ हजारांहून अधिक आहे. अपंग व्यक्तींना समान संधी मिळावी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे तसेच सक्षम व्यक्तींशी स्पर्धा करण्याचे बळ त्यांच्यात यावे यासाठी अपंग कल्याण आयुक्तालयाने २०१२ मध्ये सरकारला १८ योजनांचा सविस्तर प्रस्ताव पाठविला होता. या योजनांमध्ये बेघर, अपंगांसाठी वैयक्तिक घरकुल योजना, स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण केंद्र, मतिमंद, बहुविकलांग व गंभीर अपंगत्व असणाऱ्या प्रौढांसाठी आधारगृह, अपंग कल्याण आयुक्तालयाचे संकेतस्थळ तयार करणे, जिल्हास्तरावर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राची स्थापना करणे, स्वयंरोजगारासाठी आवश्यक भांडवल बीजभांडवलाचा पुरवठा करणे, व्यापारी गाळे बांधणे, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शालान्त परीक्षोत्तर शिक्षणासाठी अपंगांना शिष्यवृत्ती देणे, अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने देणे, अशा विविध योजनांचा यात समावेश आहे. यातील कर्मचाऱ्यांना सहायक साधने देण्याचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. याविषयी माहिती देताना अपंग कल्याण आयुक्त नरेंद्र पोयाम म्हणाले, की अपंग कल्याणकारी योजनांचा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला असून, या योजना मार्गी लागण्यासाठी सरकारकडे पाठपुरवा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
अपंगांच्या १७ कल्याणकारी योजना अद्याप कागदावरच
By admin | Published: December 02, 2014 11:41 PM