लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये पुणे शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, वस्तूस्थिती वेगळी आहे. शहरात दाखल होणार्या एफआयआरमध्ये घट जरी झाली असली तरी प्रत्यक्षात फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये पुणे शहरात सायबर क्राईमचे २३८ गुन्हे दाखल झाले आहेत. ही संख्या २०१९ मध्ये ३०९ इतकी होती. प्रत्यक्षात सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या २०१९ मध्ये ७ हजार ७४२ तक्रारी आल्या होत्या. तर, २०२० मध्ये १४ हजार ४०० तक्रारी आल्या होत्या. त्याचा प्राथमिक तपास करून प्रत्यक्ष एफआयआर दाखल होण्याचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. या वर्षी २०२१ मध्ये आतापर्यंतच १३ हजारांहून अधिक तक्रारी आले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर वाढला. लोकांनी ऑनलाईन शॉपिंगवर अधिक भर दिला. लॉकडाऊन अचानक सुरू झाल्याने ऑनलाईन सेवांचा वापरही अचानक वाढला. मात्र, त्यापर्यंत या सेवा पुरेशा सुरक्षित नव्हत्या. त्याचवेळी नागरिकांमध्ये सायबर साक्षरतेचा अभाव होता. त्याचा गैरफायदा सायबर चोरट्यांनी घेतला. त्यामुळे सायबर गुन्हे वाढू लागले आहेत.
सायबर क्राईमच्या ७० टक्के गुन्हे नेटबॅकिंगशी संबंधित सायबर क्राईमच्या ७० टक्के तक्रारींमध्ये नेटबँकिंग फसवणुकीचा समावेश आहे. बँका/मोबाईल फोन कंपन्या त्यांच्या ग्राहकांचा तपशील अद्ययावत करण्यात खूप मंद आहेत. त्यामुळे सायबर चोरटे केवायसी अपडेट करण्याचे कारण दाखवून ग्राहकांची फसवणूक करताना दिसतात
खंडणी, बदनामी, लैंगिक शोषण प्रमुख कारणे
सायबर क्राईममधील बहुतेक घटनांमध्ये खंडणी, बदनामी, लैंगिक शोषण, राजकीय हेतू आणि द्वेष भडकविणे ही कारणे दिसून येतात. फेसबुकच्या माध्यमातून बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक करणे, बदनामी करण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
बनावट वेबसाईटचा वापर
अनेकदा सायबर चोरटे हे नावाजलेल्या कंपन्या, संस्थांच्या बनावट वेबसाईट तयार करुन त्याचा सर्च गुगलवर देतात. वापरकर्ते त्याबाबत अनभिज्ञ असतात. ते सुरक्षित आणि असुरक्षित साईटमधील फरक ओळखू शकत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा वापरकर्ते गुगलवरुन त्यांना आवश्यक असलेल्या वेबसाईटचा सर्च करतात. त्यात सायबर चोरट्यांनी टाकलेल्या साईटवरुन नंबर मिळवितात. त्यामुळे त्यांची फसवणूक होताना दिसते.
तपास वेळखाऊ काम
सायबर गुन्ह्यांचा तपास करणे हे वेळखाऊ काम आहे. अनेकदा तपास करताना तांत्रिक माहितीची मोठ्या प्रमाणावर आवश्यक असते. त्याची माहिती ही संबंधित मोबाईल कंपन्या व इंटरनेट कंपन्यांचे सर्व्हर हे परदेशी कंपन्यांच्या असल्याने त्यांच्याकडून मिळणा-या माहितीवर अवलंबून राहावे लागत असल्याने तपासाला वेळ लागतो.