आळंदी : सकाळपासूनच आळंदी परिसरातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी येणाऱ्या ग्राहकांकडून नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे भाविकांची तारांबळ उडाली. खरेदी करता येईनाशी झाली. हीच परिस्थिती कमी अधिक फरकाने जेजुरी आणि मोरगाव या सारख्या जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक ठिकाणी झाली. खिशात पाचशे, हजारांच्याच नोटा असल्याने त्यांचे विविध गोष्टी खरेदी करताना प्रचंड हाल झाले, जीवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध असल्याने निश्चिंत असलेल्या आळंदीकरांचे बजेट कोलमडलेले दिसून आले.भाजी मंडईमध्येदेखील मोठ्या प्रमाणात सुट्या पैशांची वानवा दिवसभर जाणवत होती. जो तो पाचशे-हजार रुपयांची नोट काढू लागल्याने गरीब व रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या महिला तीव्र संताप व्यक्त करताना दिसत होत्या. आळंदी घाटावर मजूर अड्ड्यावरील मजूर दहा रुपयांच्या चहात चर्चा रंगवत होते. देहू - आळंदी, मरकळ - आळंदी, चाकण - आळंदी अशी भाविकांची वाहतूक करणाऱ्या वडापचा वेग आज काहीसा कमी जाणवत होता. दुसरीकडे पाचशेची नोट स्वीकारली जात असल्याने पीएमपीएल बसेसला तोबागर्दी होती. पेट्रोलपंपांवर सुटे पैसे असतील तरच इंधन भरले जात होते किंवा हजार रुपयांचे एकदाच टाकून घेण्याची अटकळही बांधली जात होती. (वार्ताहर)जेजुरीत भाविकांची तारांबळजेजूरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली, तर जनजीवनही विस्कळीत झाले आहे. कोठेही जा ‘सुट्टे पैसे नाहीत’ असाच सूर ऐकू येत असल्याने बाजारपेठेवर ही मोठा परिणाम झाला. यातच बँका, एटीएम बंद असल्याने येणाऱ्या भाविकांची मोठी अडचण झाली. बाहेरगावावरून काल पासून येथे मुक्कामी आलेल्या भाविकांनी दूरचा प्रवास म्हणून ५००-१००० च्याच नोटा बरोबर आणलेल्या होत्या. आज मात्र त्या नोटा कोणीच स्वीकारत नसल्याने त्यांची तारांबळ उडाली. पाचशे रुपयांची नोट देवून चारशे रुपये द्या अशी म्हणण्याची वेळ भाविकांवर आली होती. तर दुसरीकडे शहरातील उपहार गृहे, हॉटेल्स, किराणा मालाची दुकाने, कापड दुकाने, मेडीकल स्टोअर्स, हॉस्पिटल्स, मिठाईची दुकाने, पान स्टॉल आदी ठिकाणी अशीच परिस्थिती होती.
टंचाईपुढे भाविकांनी हात जोडले!
By admin | Published: November 10, 2016 2:07 AM