पिंपरी : शेतक-यांना २६ मार्चपासून आॅनलाईन सात-बारा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत. या आदेशानंतरही राज्यात पथदर्शी असलेल्या मुळशी तालुक्यातील बहुतेक तलाठ्यांकडून याबाबत शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला जाण्याचा प्रकार सुरू आहे. परिणामी, तलाठी कार्यालयांमध्ये अद्यापही हस्तलिखित सात-बारांची खरडपट्टी सुरू असून, काही ठिकाणी जुन्या तारखांचे सात-बारा देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. त्यांचा उपयोग होत नसून, अनेक कामे रखडत असल्याने शेतकरी व इतरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा व फेरफार मिळण्यासाठी योजना राबवीत असल्याचे सुवर्णजयंती राजस्व अभियानाच्या उद््घाटनप्रसंगी २०१३मध्ये मुळशी तालुक्यातच शासनाने जाहीर केले होते. त्यासाठी तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालयांमधील कागदपत्रांचे संगणकीकरण सुरू झाले. सुरुवातीला आलेल्या तांत्रिक त्रुटींवर मात करीत हे काम पूर्णत्वाकडे आले. मात्र, मुहूर्त सापडत नव्हता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मार्चनंतर मुळशीतील सर्व तलाठी कार्यालयांत हस्तलिखित सात-बारा बंद करून आॅनलाईन सात-बारा व फेरफार देण्याचे जाहीर केले. वास्तविक अद्यापही काही तलाठी कार्यालयांमधील माहितीचे संकलन झालेले नसताना अशा प्रकारे घाईघाईने निर्णय घेण्यात आल्याचे तलाठी कार्यालयातील कर्मचारीच बोलत आहेत. (प्रतिनिधी)
मुळशीत अद्यापही हस्तलिखित सातबाऱ्यांची खरडपट्टी
By admin | Published: April 07, 2015 5:31 AM