पुणे : पुण्यात २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’साठी अद्याप जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसून, इतर अनेक विभागाच्या एनओसी व सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच मंगळवारी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.अमली पदार्थाचा गैरवापर व इतर अनेक गोष्टींमुळे गोव्यात वादात सापडलेला सनबर्न फेस्टिव्हल यंदा पुण्यात होत आहे. गोव्यामध्ये प्रचंड विरोध झाल्यानंतर हा फेस्टिव्हल पुण्यातील केसनंद येथे आयोजित करण्यात आला आहे. २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन या सनबर्न फेस्टिव्हलबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देणे केवळ औपचारिकता ठरणार आहे. परंतु सध्या या फेस्टिव्हल स्थानिक ग्रामस्थ व हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे पुण्यातदेखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याबाबत मुठे यांनी सांगितले की, सनबर्न फेस्टिव्हलसाठी इतर अनेक विभागांच्या परवानग्या घेणे बंधनकारक आहे. या सर्व परवानग्या आल्यानंतर अंतिम परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येते. अद्याप आयोजकांनी सर्व कागदपत्रे व आवश्यक त्या परवानग्या सादर केलेल्या नाहीत.
‘सनबर्न’ फेस्टिव्हलवर टांगती तलवार
By admin | Published: December 27, 2016 3:28 AM