बारामती : कुंभमेळ्यात जे घडलं ते आषाढी वारीबाबत घडू नये. यासाठी सर्वांशी चर्चा करून यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे. परंपरा टिकली पाहिजे असं आम्हाला सुद्धा वाटतं मात्र तिसऱ्या लाटेची पूर्वसूचना असताना त्याचाही विचार करणे आवश्यक आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारने यंदाच्या वर्षीदेखील आषाढी पालखी सोहळा बसने होणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील मानाच्या १० पालखी सोहळ्याला ६० वारकऱ्यांसह १९ जुलैला पंढरपूरला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर बारामती येथे माध्यमांशी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, राज्य सरकारने सर्व चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे चाललेली परंपरा टिकली पाहिजे, असे आम्हाला सुद्धा वाटते. परंतु सध्याच्या कोरोना सावटाचाही विचार आपल्याला केला पाहिजे. सर्व अधिकारी,पोलिस अधिकारी यांनी सर्वांशी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. वाखरीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या विधीसाठी शिथिलता देण्यात आली आहे. मागील वर्षी जसे निर्बंध होते, तसे आता निर्बंध लावलेले नाहीत. कुंभमेळ्याबाबत जे घडलं तसं इथे घडू नये याचीही दक्षता घेणं आवश्यक आहे. आम्ही वारकरी सांप्रदायाच्या भावनांचा आदर करतो, राज्याचं आरोग्याचं हित याकडेही लक्ष दिलं पाहिजे. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं काही बाबतीत सर्व विचार करुनच निर्णय घ्यावा लागतो. आताही वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र असतील, तर विभागीय आयुक्तांना सुचना देऊ. संबंधित मान्यवरांशी चर्चा करण्याबाबत सांगू, असेही पवार म्हणाले.-----------------------------------