पिंपरी : हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनी पुनरुज्जीवनाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कंपनीला नवसंजीवनी मिळावी यासाठी शंभर कोटींचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करीत एचए कामगारांनी गुरुवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलालाची उधळण करण्यात आली. ‘कामगार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है’ अशा घोषणा देण्यात आल्या. एचए कंपनीच्या प्रवेशद्वारावर द्वारसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी एचए मजदूर संघाचे उपाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे होते. या वेळी संघाचे महासचिव सुनील पाटसकर, भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत धुमाळ आदी उपस्थित होते. हा विजय कामगार एकजुटीचा, त्यांच्या संयमाचा आणि सहनशीलतेचा आहे. कंपनीला टिकविण्यासाठी उत्पादनक्षमता वाढविणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादन एचए मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. बोऱ्हाडे म्हणाले की, या निर्णयामुळे एचए कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार आहे. पगार नसतानाही काम सुरू ठेवले. अशा कामगारांच्या सहनशीलतेचे कौतुक करावे लागेल. कंपनी आपल्याला जगवायची आहे. यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. पाटसकर म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे एक दिशा मिळाली आहे. मात्र, परीक्षा संपलेली नाही. कारखान्यातील उत्पादन अधिक वाढविण्यासाठी कंबर कसावी लागेल. या संधीचे सोने करावयाचे आहे. कंपनीला नफ्यात आणावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
एचए कामगारांचा आनंदोत्सव
By admin | Published: December 23, 2016 12:42 AM