पुणे : यंदा देशभरात चांगला पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी, उत्तर महाराष्ट्रातही चांगला आणि विशेष म्हणजे मराठवाड्यात अतिशय चांगला पाऊस पडणार आहे. ग्रहांच्या युतीवरून आणि वराहमिहिर यांच्या संकेतानूसार हे भाकीत करण्यात येत आहे, अशी माहिती पर्जन्य अभ्यासक व हायटेक बायोसायन्सेस इंडियाचे अध्यक्ष डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी दिली.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने शुक्रवारी (दि.३१) ‘वेध पर्जन्यमानाचा : आधार प्राचीन वाड्:मयाचा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी भांडारकर संस्थेचे मानद सचिव सुधीर वैशंपायन, ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे उपाध्यक्ष दीपक जोशी उपस्थित होते.
डॉ. गायकैवारी म्हणाले, ग्रहांची स्थिती आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम याविषयी गणितीय पध्दतीने आम्ही अभ्यास केला आहे. होळी आणि अक्षयतृतीया या दोन दिवशी वाऱ्याची दिशा कशी आहे, त्यानूसार ठरवतो की, त्या स्थानिक पातळीवर कसा पाऊस असेल. याबद्दलचे अंदाज वर्तविता येतो. हा अंदाज ८० ते ९० टक्के बरोबर येतो. याचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा.
कोणत्या भागात किती पाऊस पडेल, याबाबत आयएमडी सांगत नाही. परंतु, या पध्दतीने ते सांगता येईल. त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’’ ‘‘कुठले धान्य लावावे, काेणत्या धान्याला भाव येईल, याचे आर्थिक गणित वराहमिहीर यांनी लावलेला आहे. त्या काळात बारा बालुतेदारांवर आर्थिक व्यवस्था होती. त्यामुळे त्यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास करून पावसाबद्दल भाकीते केली आहेत. या सर्वांचा अभ्यास आम्ही करतोय आणि त्यावर गणितीय पध्दत विकसित करत आहोत. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी आणि पुढील काही वर्षांतील नोंदी याचा मेळ घालून आम्ही पावसाबाबत अभ्यास करतोय,’’ असे गायकैवारी म्हणाले.
मराठवाड्यात चांगला पाऊस !
यंदा त्रिवेंद्रमला २८ मे रोजी पाऊस आला, तर तळकोकणात रत्नागिरीत ५ ते ७ मे रोजी येईल. पुण्यामध्ये तो ८ ते १० मे दरम्यान येईल, तर १८ ऑक्टोंबर रोजी मॉन्सून परतेल. या हंगामात महाराष्ट्रात १५ ते २७ ऑगस्ट दरम्यान पावसाचा खंड पडेल. धरणांमध्ये चांगला पाऊस असणार आहे, तर खान्देश परिसरात कमी पाऊस असेल. मराठवाड्यात मात्र चांगला पाऊस आहे, असे डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी सांगितले. त्या-त्या भागातील सरासरीनूसार हा कमी-अधिक अंदाज आहे.
पाचव्या शतकात २२ डिसेंबरला संक्रांत होती. त्या दिवशी दिवस मोठा व्हायला लागला. सूर्यास्त पुढे जायला लागला आणि सूर्यास्त अलिकडे यायला लागला. आता लक्षात येतेय की, सूर्यादय आणि सूर्यास्त एक मिनिटांनी पुढे जात आहे. पण दिनमान तेच राहते. ८६ वर्षांसाठी हा पॅटर्न राहणार आहे. दिवस वाढतोय म्हटल्यावर उन्हाळा वाढायला हवा होता. आज मार्च संपेपर्यंत थंडी जाणवते. हा जो परिणाम आहे तो पावसावर होणार आहे का ? त्याचा अभ्यास करायला हवा. - डॉ. राघवेंद्र गायकैवारी, अध्यक्ष, हायटेक बायोसायन्सेस इंडिया.