पुणे : नाकात नथ, केसात माळलेला गजरा, नऊवारीपासून गुजराती, बंगाली पद्धतीच्या रंगीबेरंगी साड्यांच्या पारंपरिक वेशभूषेत पुणेकर महिला ‘सखी श्रावण सोहळा’ कार्यक्रमात दंग झाल्या. म्हाळसा, बानूच्या वेशभूषेत आलेल्या महिलांमुळे फॅशन शोसारखे वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांचा गजर आणि मंगळागौरही येथे साजरी झाली. मराठी-हिंदी गाण्यांची श्रावणधारा मैफलही येथे रंगली. निमित्त होते लोकमत सखी मंचच्या वतीने हिरो डुएट, महाभृंगराज तेल, एलटीए स्कूल आॅफ ब्युटी, अनमोल कला, कृष्णा पर्ल्स, अमित गायकवाड यांचे कृष्णसुंदर गार्डन यांच्या सहयोगाने आयोजित श्रावण सोहळा कार्यक्रमाचे. ढोल-ताशांच्या दणदणाटातच कार्यक्रमाला सुरुवात झाली. हिरो डुएटचे शलाभ राजवंशी, मानव मेहरा, हिना गोयल, महाभृंगराज तेलच्या संचालिका अपर्णा कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, प्राची कुलकर्णी, एलटीएचे निकुंज गाला, कृष्णा पर्ल्सच्या स्मिता सोमाणी, अनमोल कलाचे अनमोल बनकर, कृष्णसुंदर गार्डनचे अमित गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते.घरच्या व्यापातून वेळ काढून चार निवांत घटका सखींना अनुभवयास मिळाव्यात यासाठी पूजा थाळी सजावट, मेंदी स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा, पाककृती स्पर्धा, उखाणे, फॅशन शो अशा विविध स्पर्धा झाल्या. तरुणींपासून ते साठीनंतरही तरुण असलेल्या महिलाही यामध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. अनेक चिमुकल्याही पारंपरिक वेशभूषेत आल्या होत्या. या कार्यक्रमात हिरो डुएट या गाडीचे लॉन्चिग करण्यात आले होते. श्री महालक्ष्मी मंगळागौर ग्रुपने मंगळागौरीचे विविध खेळ सादर केले. खडकावरचं झुळझुळ पाणी..., फुगड्या, आडवळ घूम...पडवळ घूम, नखुल्या बाई नखुल्या... असे विविध प्रकारचे खेळ या वेळी सादर करण्यात आले होते. या वेळी संदीप शर्मा यांच्या कोेरिओग्राफीतून फॅशन शो उत्साहात झाला. एलटीएच्या टीमने सहभागी मॉडेल्सचे खास मेकअप केले. उखाणे स्पर्धेत तर सखींची हसून पुरेवाट झाली. विद्या खोत यांनी परीक्षण केले. मेंदी स्पर्धेमध्ये अरेबियन मेंदी, दुल्हन मेेंदी, भावाच्या हातावर राखी बांधतेय अशी मेंदी, ब्रायडल मेंदी, मल्टी कलर मेंदी, गुजराती मेंदी रंगली होती. अनमोल बनकर यांनी परीक्षण केले. पाककृती व थाळी सजावट स्पर्धेचे परीक्षण संगीता शहा यांनी केले होते. थाळी सजावटीत नवरात्रीचा घट, देवीचा शृंगार, करवा चौथ थाळी अशा विविध प्रकारच्या आकर्षक थाळी या वेळी बनविण्यात आल्या होत्या. पाककृती स्पर्धेमध्ये पौैष्टिक लाडू, मेथीचे पोहे, केक, तंबूल बर्फी, ज्वारीचे नुडल्स, उकडीचे मोदक अशा पाककृती बनविण्यात आल्या होत्या. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ढोल-ताशा पथकाच्या अध्यक्षा वृषाली मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. पहिल्या सत्राचे संदीप पाटील यांनी, तर दुसऱ्या सत्रामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले.