बारामती (पुणे): सोशल मीडियामुळे मैत्रीचे रूपच बदलले आहे. केवळ फेसबुकवर फ्रेण्ड्स असल्याने फार फार तर व्हाॅट्सॲपवर चॅटपुरती मैत्री राहिली आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळातील मित्र-मैत्रिणीतील प्रेमाचा गोडवा, मायेचा ओलावा या व्हर्टिकल मैत्रीत दिसत नाही. त्यामुळे या व्हर्टिकल जगातून बाहेर येऊन प्रत्यक्ष भेटण्यासाठी जागतिक मैत्री दिनाचे औचित्य तरुणाईसाठी पर्वणीच ठरत आहे. त्यामुळे आपल्या मित्र-मैत्रिणीला मैत्रीचा धागा बांधण्यासाठी आणि छान गिफ्ट देत मैत्री दिन साजरी करण्यासाठी तरुणाईने बाजारपेठ फुलली आहे.
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार ‘मैत्री दिन’ म्हणून साजरा केला जातो. अवघ्या २४ तासांवर (दि. ७) हा दिवस आला आहे. मैत्रीचे सहवासाचे बंध गुंफण्यास अनेकांची आज सुरूवात होते. त्यासाठी काहीजण मैत्री दिनाचा मुहूर्त साधतात. बाजारात हा ‘स्पेशल डे’ साजरा करण्यासाठी तरुणाईची धांदल उडाली आहे. मैत्रीच्या नात्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सध्या भेटवस्तू, ग्रिटींग खरेदीची तरुणाईची ‘क्रेझ’ वाढत आहे.
यावर्षीच्या मैत्री दिनासाठी स्टील बँड, विशिंग बॉटल, कॅमेरा लेन्स, मग, फ्रेंडशीप की-चेन, चॉकलेट, फुले, रंगीत बँडसह मॅग्नेटिक ग्लास, पेन स्टँड, ब्रेसलेट, स्माईली, पेपर बॅग, टेडी, लिटील बुक ऑफ फ्रेंडशीप कोटेशन, कॉफी मग, वॉटर ग्लोब, वुडन फ्रेम, कॅलेंडर, स्माईल मग, चॉकलेट बुके, टेडीज्, सॉफ्ट टॉईज, रिंग्ज, लकी बॉटल्स, लेदर बँड, लखोटे, ग्रिटींग्ज, घड्याळ, पेंडल्स, म्युझिकल फ्लॉवर्स, प्लास्टिक गुलाब, परफ्युम्स, फोटो फ्रेम आदी वस्तूंची विशेष चलती आहे. मुलींना विशेषत: मांजर आवडते. त्यामुळे सॉफ्ट टॉईज स्वरुपातील ‘म्युझिक कॅट’ यंदा हटके गिफ्ट ठरणार आहे.
‘मॅजेस्टिक’चे राजेंद्र आहेरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, यंदा ‘मेड इन चायना’च्या वस्तूंचीही किंमत वाढली आहे. शिवाय ऑनलाईन गिफ्टमुळे स्थानिक बाजारात मंदीच आहे. मात्र, दुसरीकडे ‘मेड इन इंडिया’च्या वस्तूंची चलती असल्याचे चित्र आहे. रबर बँड या कॉमन वस्तूला मोठी मागणी आहे. शिवाय ‘मेड इन इंडिया’ स्टील बेल्टला विशेष पसंती आहे. दोन रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत ‘फ्रेंडशीप बँड’ उपलब्ध आहेत. १०० रुपयांपासून ३,८०० रुपयांपर्यंत भेटवस्तूंना मागणी आहे. चीनसह थायलंड, कोरिया येथील वस्तू देखील उपलब्ध आहेत. तसेच मैत्री दिनाचे संदेश देणाऱ्या लखोट्यांची मागणी आहे. त्यामधील अर्थपूर्ण संदेश तरुणाईचे आकर्षण ठरले आहेत. फ्रेंडशिप फॉरएव्हर, मैत्री आणि आपण असे अनेक संदेश या लखोट्यांतून व्यक्त करण्यात आले आहेत, असे आहेरकर यांनी सांगितले.
... डिजिटलच्या प्रभावातही भेटकार्डची मागणी कायम
सोशल मीडियावरील मैत्री केवळ ऑनलाईनपुरतीच मर्यादित आणि अनेकदा कृत्रिम असते. मैत्रीची जागा डिजिटल माध्यमांनी घेतली आहे. मात्र, आजही डिजिटल जमान्यात भेटकार्डातील संदेशांनी तरुणाईच्या मनावर गारुड घातले आहे. डिजिटल, सोशल मीडियाच्या प्रभावात मैत्रीचा संदेश देणारे भेटकार्ड आपले अस्तित्व टिकवून आहे.