पुणे : ऐतिहासिक दस्ताऐवजांमधून संदर्भाचा खजिना खुला करणारी प्रमुख लिपी म्हणून मोडी लिपीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या मोडी लिपीच्या संवर्धनासाठी लिपीतज्ज्ञ अभ्यासक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध पातळींवर प्रयत्न सुरू असले तरी मोडी लिपीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी साताऱ्याच्या फडके दाम्पत्याने पणत्यांवर मोडी लिपीमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा लिहिण्याचा अभिनव प्रयोग साकारला आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या या उपक्रमाला इतिहासप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळत असून, दीपावलीच्या झगमगाटात पणत्यांच्या रोषणाईतील त्यांचा मोडी लिपीमधील हा दिवा चांगलाच स्थिरावतो आहे. चरिता फडके या स्वत: इतिहास-मोडी लिपी अभ्यासिका व तज्ज्ञ असून, त्यांनी कॅलिग्राफीचा कोर्सही केला आहे. या संकल्पनेची मुहूर्तमेढ त्यांनी दोन वर्षांपूर्वी रोवली. यात पती श्रीधर फडके यांची त्यांना मोलाची साथ लाभली. (प्रतिनिधी)
पणत्यांवर मोडी लिपीत शुभेच्छा
By admin | Published: October 24, 2016 1:39 AM