लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : विठुमाऊलीचा गजर अन् वीणेचा नादमय झंकार... टाळ-मृदंगाचा निनाद अन् त्यावर वारकऱ्यांनी धरलेला नादमय ताल... मुखाने ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड गजर करीत हजारो वैष्णवांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाल्या.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दुपारी चारच्या सुमारास पुण्यनगरीत आला. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी कळस येथे आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्वागत केले. तसेच, संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत आयुक्तांनी बोपोडी येथे केले. रात्री नानापेठ येथील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये तुकोबारायांचा तर भवानीपेठेतील पालखी विठोबा मंदिरात ज्ञानोबा माउलींचा पालखी सोहळा विसावला.
धारकरी ठाण मांडून बसले!
दरवर्षी धारकरी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. यंदा मात्र त्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. सर्व धारकरी फेटे घालून सायंकाळी ५ वाजता संचेती रुग्णालय चौकात आले. त्यांनी एका बाजूने रस्त्यावरच ठाण मांडले आणि दोन्ही पालख्यांचे स्वागत केले. कोणीही धारकरी पालखी सोहळ्यात घुसला नाही. ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘हिंदू साम्राज्य राष्ट्राचा विजय असो’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी होती.
दोन दिवस पुण्यात मुक्काम
दोन्ही पालख्यांचा दोन दिवस पुण्यात मुक्काम राहणार आहे. बुधवारी संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे मुक्कामी जाईल, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटाची अवघड चढण चढून सासवड मुक्कामी विसावेल. सासवडमध्ये माउलींचा दोन दिवस मुक्काम राहील.
हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवर्षाव
- संचेती रुग्णालय चौकात दोन्ही पालख्या पोहोचल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे पालखी सोहळ्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला. तेव्हा सर्व वारकऱ्यांनी हा अनोेखा क्षण आपल्या डोळ्यांत टिपून घेतला.
- ज्ञानोबा माउलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली. तेव्हा दर्शनासाठी एकच गर्दी झाली होती.
- जगद्गुरू तुकोबारायांची पालखी पुण्यातील संचेती चौकात दाखल झाल्यावर तिचे स्वागत करण्यात आले.
शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पैठणहून पंढरपूरला निघालेल्या पालखीचे सोमवारी बोधेगाव (जि. अहमदनगर) येथे आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांकडून भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत श्री बोधेश्वर मंदिरात पालखी विराजमान केल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पैठण ते पंढरपूर या पालखी सोहळ्यास ४२५ वर्षांचा इतिहास आहे.
वारीऐकू येई कानी ! बोलतात टाळ !म्हणती “विठ्ठल” ! ‘पांडुरंग” !!मागे राही कसा ! बोले हा मृदुंग“सखा पांडुरंग” ! “हरी हरी” !!येऊन साथीस ! म्हणे एकतारी !“भजावा मुरारी” ! “जीवभावे”गुणगुणे कानी ! मंजुळ ही विणा !“येरे नारायणा “ ! “मायबापा” !!सोबतीस आला ! बोले पखवाज !“माझा घनशाम” ! “सावळा हा” !!इंद्रायणी निघे ! होण्या चंद्रभागा !ज्ञानाची ही गंगा ! भक्ती मार्गे !!- विलास सूर्यकांत अत्रे