पुणे : कुणाचा वाढदिवस असो किंवा कुठला सण असो, ‘पार्टी तो बनती है बॉस!’ असं म्हणत जोरदार सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाई तयारच असते. ख्रिसमस पार्टी संपली न संपली तोवर आता तरुणाईला न्यू इयरच्या पार्टीचे वेध लागले आहेत. फुल-टू-धमाल करत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. न्यू इयरचे सेलिब्रेशन ३१ डिसेंबरपासूनच सुरू झाले आहे.
रात्रीचे बारा वाजले आणि ‘हॅप्पी न्यू इयर’चा जल्लोष करत तरुणाईने नव्या वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहरात मोठ्या आनंदात नाच-गाण्याने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
नवीन वर्षात प्रवेश करताना अनेक चांगल्या गोष्टी करण्याचे नवीन संकल्प तरुणांनी केले आहेत. कुणी सिगारेट सोडणार, कुणी दारू सोडणार, कुणी ट्रेकला जाणार, तर कुणी लग्नाच्या बंधनात अडकणार असे वेगवेगळे संकल्प केले आहेत. त्यासोबतच 'ट्रुथ अँड डेअर', कोल्ड्रिंग पीत त्यासोबत मजेशीर गेम खेळत येणाऱ्या वर्षाचे सेलिब्रेशन केलं.
लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण न्यू इयर खूप जोरात आणि धूमधडाक्यात साजरा करतात. मोठमोठ्या पार्टीमध्ये नाच - गाणे, खाणे-पिणे होतेच. या थर्टी फर्स्ट पार्टीची रंगत वाढविण्यासाठी आम्ही काही खास गेम्स खेळलो आणि थर्टी फर्स्ट पार्टीला धमाल केली.
- धैर्य ठक्कर
न्यू इयर पार्टीमध्ये आम्ही कॉफी शॉर्ट्स हा खेळ खेळलो. यामध्ये कॉफीचे छोटे-छोटे प्याले शॉर्ट्स ग्लासमध्ये भरून ठेवले. त्यानंतर भरपूर चिठ्ठया बनवल्या. चिठ्ठयांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या होत्या. समजा एका व्यक्तीने उचललेल्या चिठ्ठीमध्ये लिहिले असेल की, काळ्या रंगांचे कपडे परिधान केलेली व्यक्ती, तर पार्टीमध्ये जितक्या व्यक्तींनी काळ्या रंगांचे कपडे घातले असतील त्या सगळ्या व्यक्तींना शॉर्ट्स प्यावे लागतील.
- सिद्धी पटेल