श्रीकिशन काळे, पुणे : अतिशय दुर्मिळ झालेल्या आणि अभयारण्यातूनच नामशेष होत असलेला माळढोक बुध्दपौर्णिमेच्या मुहूर्तावर पर्यावरणप्रेमींना दिसला आहे आणि त्यामुळे पर्यावरणप्रेमी, वन विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कारण नान्नज अभयारण्यामध्ये माळढोक नसल्याची स्थिती अनेक वर्षांपासून होती. तिथे एक मादी माळढोक दिसल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदोत्सव दिसून येत आहे.
वन विभागाच्या वतीने बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्री प्राणीगणनेचे आयोजन केले होते. भीमाशंकर अभयारण्य, ताम्हिणी अभयारण्य, सुपे मयुरेश्वर अभयारण्य, रेहुकुरी काळवीट अभयारण्य या ठिकाणी ही प्राणीगणना झाली. त्यामध्ये शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. चांदण्या रात्री त्यांना विविध प्रकारचे प्राणी, पक्षी पहायला मिळाले. सर्वात आनंदाची बाब म्हणजे नानज माळढोक अभयारण्यात एक मादी पाणवठ्यावर दिसली.
माळढोक अभयारण्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या माळढोक पक्ष्याचे दर्शन हा या प्राणिगणनेमधील सर्वात महत्त्वाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया निसर्गप्रेमींनी दिली. काही वर्षांपूर्वी माळढोक अभयारण्यात शंभर-शंभर माळढोक पक्षी नांदायचे. पण हळूहळू ते नामशेष झाले आणि गेल्या वर्षी व त्याअगोदर एकही माळढोक आढळून आला नव्हता. कधी तरी मध्येच एक मादी दर्शन देऊन जायची. या वेळी प्राणीगणनेमध्ये ती मादीच दिसली. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा त्यांचे कुटुंब वाढीस लागेल, अशी अपेक्षा पक्षीप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
प्राणीगणनेच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुणे वन विभागाचे (वन्यजीव) उपवनसंरक्षक तूषार चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याकडे दीडशे ते दोनशे जणांनी नोंदणी केली होती. त्यानूसार त्यांनी नियोजन केले आणि अनेकांनी अभयारण्यांमध्ये मचाणावर बसून प्राणीगणनेचा आनंद लुटला. प्राणिगणनेमध्ये चिंकारा, मोर, तरस, खोकड, वटवाघुळ, लांडगा, ससा, रानमांजर, कोल्हा आदी प्राणी पहायला मिळाले. विशेष म्हणजे नानज अभयारण्यात माळढोक दिसला. जे या अभयारण्याचे विशेष वैशिष्ट्य आहे. ४० पाणवठ्यावर १०० हून अधिक निसर्गप्रेमींनी प्राणिगणनेचा आनंद लुटला.- तूषार चव्हाण, उपवनसंरक्षक (वन्यजीव), पुणे वन विभाग