नारायण बडगुजर
पिंपरी : जात, धर्म, वंश, भाषा किंवा राष्ट्रीयत्व, अशा प्रकारच्या प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात. भौगोलिक तर नाहीच. त्यामुळे शत्रू राष्ट्र असलेल्या दोन देशांमधील तरुण व तरुणींचे सूत जुळून ते विवाहबंधनात अडकतात. अशाचप्रकारे पाच परदेशी तरुणी गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांच्या प्रेमात पडून त्यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. (Happy Valentine’s Day 2022)
कुठे कोणी सात फेऱ्यांची वचनपूर्ती करताना प्रेमाला अक्षरश: तुडवायला तयार असतात तर कुठे कोणी सातासमुद्रापार जाऊन प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. तुमच्यासाठी काय पण, असे म्हणत अनेक जण आपली माणसं, आपले गाव, शहर, प्रांत, देश सोडून प्रियकर किंवा प्रेयसीकडे जातात. प्रियकर आणि प्रेयसीसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ हा पर्वणीच असतो.
पिंपरी-चिंचवड शहरात देखील अशा पाच तरुणी आहेत. त्यांनी त्यांच्या मायदेशाला सोडत प्रियकरासाठी पिंपरी-चिंचवडकर होण्याचे पसंत केले. ही प्रेमाची जादूच आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. यातील काही तरुणी कामानिमित्त तर काही पर्यटन तसेच शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आल्या होत्या. दरम्यान त्यांचे पिंपरी-चिंचवडमधील तरुणांशी सूत जुळले. हृदयाच्या कप्प्यात प्रेमाची रुजवात झाली. त्यांनी एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त केले. त्यानंतर ते विवाहबंधनात अडकले.
प्रेमासाठी सातासमुद्रापार
हिंदी चित्रपटातील ‘सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई’ या गाण्यानुसार पाच परदेशी तरुणी प्रेमासाठी सातासमुद्रापार आल्या आहेत. चित्रपटातील कथानकाप्रमाणेच या तरुणींनी पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांवर प्रेम करून त्यांच्याशी संसार थाटला आहे. या प्रेमी युगुलांच्या कुटुंबियांनी देखील त्यांचा स्वीकार केला आहे.
परदेशी बाबू झाला पिंपरी-चिंचवडचा जावई
परदेशी तरुणींप्रमाणेच एक परदेशी तरुण पिंपरी-चिंचवड शहरातील एका तरुणीच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न केले आणि तो पिंपरी-चिंचवडचा जावई झाला. नेदरलॅंड या देशातील असलेल्या या परदेशी बाबूला भारतीय संस्कृतीचे अप्रुप आहे.
परकीय नागरिक विभागाकडे नोंदणी
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या प्रेमी युगुलांना एकमेकांच्या देशात जाण्यासाठी कायदेशीर मुभा दिली जाते. त्यासाठी त्यांना रितसर अर्ज करावा लागतो. कागदपत्र सादर केल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अशा परदेशी नागरिकांची परकीय नागरिक नोंदणी विभागाकडे नोंदणी केली जाते. पिंपरी-चिंचवडच्या सून झालेल्या परदेशी पाच तरुणी तसेच जावई झालेल्या नेदरलॅंड येथील तरुणाने या विभागाकडे नोंदणी केली आहे.
या देशातील तरुणी झाल्या पिंपरी-चिंचवडच्या सून
- मोराक्को
- फिलिपिन्स
- पेरू
- लॅटविया
- यूएसए