पिंपरी : अवघ्या सहा महिन्यांवर महापालिका निवडणूक आली असल्याने इच्छुकांनी प्रचारयंत्रणा कार्यान्वित केली आहे. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्स अॅप, फेसबुक या सोशल मीडियाचा वापर त्यांच्याकडून अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. खासगी एजन्सी नेमून वॉर्डातील मतदारांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. वाढदिवस, सण, उत्सव या निमित्ताने वारंवार व्हॉट्स अॅपवर शुभेच्छा संदेशांचा मारा केला जात आहे. जेमतेम शिक्षण झालेले नगरसेवक, इच्छुक उमेदवारही आता स्मार्ट फोनचा वापर करू लागले आहेत. वॉर्डात होणाऱ्या कार्यक्रमांची, उपक्रमांची माहिती व्हॉट्स अॅप, तसेच फेसबुकवर अपलोड करण्याची खास यंत्रणा त्यांनी राबवली आहे. केवळ हेच काम करण्यासाठी काही कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. इच्छुकांनी स्वत:ची निवडक छायाचित्रे मोबाइलवरील माहिती अपडेट करणाऱ्यांकडे दिली आहेत. दरमहा विशिष्ट रक्कम अदा केली जात असल्याने सोशल मीडियावर सातत्याने त्यांचे अपडेट्स पाहावयास मिळू लागले आहेत. नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयात जुन्या मतदार याद्या चाळण्याचे, मतदारांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते यांचे वाढदिवस आता धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. दर वर्षी दहीहंडी, गणेशोत्सवासाठी वर्गणी मागण्यास येणाऱ्या कार्यकर्त्यांशी इच्छुक उमेदवार यंदा स्वत:च संपर्क साधू लागले आहेत. किती वर्गणीची अपेक्षा आहे, अशी त्यांना विचारणा होऊ लागली आहे. पावती पुस्तक घेऊन वर्गणीसाठी नगरसेवकांच्या कार्यालयात खेटे माण्याची वेळ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर येणार नाही. नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारच त्यांच्या भेटीला जाऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)
सोशल मीडियावरून इच्छुकांच्या शुभेच्छा
By admin | Published: September 01, 2016 1:21 AM