पुणे : शहरात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढली असली तरी सध्या आंब्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. गुढीपाडव्यापर्यंत हे भाव चढे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आंब्याची आवक वाढून भाव आवाक्यात येऊ शकतील.यंदाच्या हंगामात कोकणात पोषक हवामानामुळे हापूसचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात हापूसची आवक चांगल्या प्रमाणात सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही आवक लवकर सुरू झाली आहे. बाजारात येत असलेल्या हापूसचा आकार आणि दर्जाही चांगला आहे. गेल्या वर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर आवक कमी असतानाही ग्राहकांकडून हापूसला चांगली मागणी होती. सध्या तयार रत्नागिरी हापूसला प्रतिडझन ५०० ते १००० तर कच्च्या आंब्याला ५०० ते ८०० रुपये भाव मिळत आहे. गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळबाजारात आंब्याच्या सुमारे २ हजार पेट्यांची आवक झाली. तर, कर्नाटक येथून २ ते ३ हजार पेटी आवक झाली. बाजारात दाखल होत असलेला हापूसचा दर्जा चांगला असून खराब आंब्याचे प्रमाण केवळ १० ते २० टक्के आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आंब्याची आवक वाढेल, अशी माहिती आंब्याचे व्यापारी करण जाधव आणि अरविंद मोरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
हापूस आंब्याचे भाव आवाक्याबाहेर
By admin | Published: March 20, 2017 4:45 AM