- प्रकाश गायकर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात येणार आहे. नागरिकांना ध्वज उपलब्ध होण्यासाठी महापालिका तीन लाख ध्वज खरेदी करून त्याची विक्री करणार आहे. त्यासाठी पुरवठादारांची नेमणूक केली आहे. मात्र, गुजरातला तयार होणाऱ्या झेंड्यांच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनापूर्वी तीन लाख ध्वज उपलब्ध करण्यासाठी पुरवठादारांसह अधिकाऱ्यांची धावपळ झाली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण देशभर ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या या मोहिमेंतर्गत नागरिकांना शुल्क देऊन झेंडे खरेदी करावे लागतील. त्यासाठी प्रशासनाने ३ लाख झेंडे खरेदी करण्याची निविदा काढली. त्यामध्ये पिंपरीच्या सिद्धी कॉपियर ॲण्ड स्टुडंट कन्झ्युमर स्टोअर्स, भोसरीच्या सूरज स्विचगेअर कंपनी आणि चिंचवडच्या अर्थरॉन टेक्नॉलॉजीस एंटरप्रायजेस यांची १४.२८ टक्के कमी दराने निविदा पात्र ठरली. ते २४ रुपये दराने प्रत्येकी एक लाख ध्वज उपलब्ध करून देणार आहेत. एकूण ३ लाख कापडी (पॉलिस्टर) ध्वजासाठी ७२ लाख खर्च येणार आहे.
संपूर्ण देशामध्ये ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात येणार असल्याने ध्वजांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामध्येच ध्वज तयार करणाऱ्या ठराविक कंपन्या आहेत. शहरातील पुरवठादार ध्वज घेणार असलेल्या कंपन्या या गुजरातमध्ये आहेत. संपूर्ण देशामधून गुजरातच्या या कंपन्यांकडे ध्वज खरेदीसाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांना वेळेत पुरवठा करणे शक्य होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.