पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील सुमारे ५० लाख घरांवर घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत तिरंगा फडकणार आहेत. त्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. देशभर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये या अभियानांतर्गत किमान एका ठिकाणी ७५ फूट उंचीवर झेंडा फडकविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अमृत महोत्सवानिमित्त विभागात सर्वत्र वातावरण निर्मितीसाठी देशभक्तीपर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये पथनाट्य, लघूपट, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, साहसी खेळ, मॅरेथॉन, सायकल मॅरेथॉन, रांगोळी स्पर्धा, व्याख्यानमाला, प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत आयोजित कार्यक्रमांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
पुणे विभागात ग्रामीण भागातून २९ लाख ९८ हजार १४२ तर, शहरी भागातून १९ लाख ६५ हजार ६६९ असे एकूण ४९ लाख ६३ हजार ८११ झेंड्यांची मागणी आली आहे. त्यापैकी ४० लाख ७२ हजार ८११ झेंडे उपलब्ध आहेत. उर्वरित १३ लाख १ हजार पैकी १० लाख ९६ हजार झेंडे केंद्र सरकारकडून उपलब्ध झाले आहेत.
झेंडा हा हाताने कापलेल्या, विणलेल्या किंवा मशीनद्वारे सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी, लोकरपासून तयार केलेला असावा. तो ३:२ या प्रमाणात असावा. केशरी रंग वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील, याप्रमाणे झेंडा फडकवावा. तो उतरवताना सन्मानाने उतरावा. झेंडा कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी. झेंडा प्लास्टिक किंवा कागदी वापरू नये. झेंड्यावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह काढू नये. राष्ट्रध्वज फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. झेंडा फडकविताना राष्ट्रध्वजाचा सन्मान करत ध्वजसंहितेचे पालन करावे.
- सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे