पुणे : पूर्वी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम मर्यादित व्हायचे; मात्र यंदा अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घर या महोत्सवात सहभागी होईल यासाठी प्रयत्न केला. त्यासाठीच तिरंगी ध्वजाबाबतचे नियमही काही प्रमाणात शिथिल केले आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी उद्घाटन झाले. त्यावेळी पाटील यांनी या मोहिमेची माहिती दिली. पाटील म्हणाले, भारतीय संस्कृती सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आहे हे जगाला कळावे असा मोदींचा प्रयत्न आहे. आपला देश वसाहतवादी नाही हे त्यांना सांगायचे आहे.
भाजपच्या शहर शाखेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात क्रांतिकारकांचे तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय यांचा गौरव करण्यात आला. सर्जिकल स्ट्राईकची आखणी करणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचे यावेळी भाषण झाले.