जेजुरी : दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे खळद, खानवडी, एखतपूर, मुजवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने बुधवारी चैत्र शुद्ध द्वादशीला ‘हर हर महादेव’च्या जयघोषात, शिवभक्तीच्या प्रेरणेने बिगरदोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुगी घाट सर केला. पायी वारीने आणलेल्या कऱ्हेच्या पवित्र जलाने निवृत्तीमहाराज खळदकर यांच्या हस्ते स्वयंभू ‘श्रीं’ना धार (जलाभिषेक ) घातली.
येथे शंभुमहादेवाची यात्रा दर वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. यात्रा-उत्सव काळात पंचमीला हळदी, अष्टमीला ध्वज चढविणे व रात्री शिवपार्वतीचा विवाह सोहळा. यानंतर चैत्र शुद्ध द्वादशीला तून पवित्र नद्यांचे जल घेऊन आलेल्या कावडींनी ‘श्रीं’ना जलाभिषेक (धार) घालण्याची परंपरा आहे.याच परंपरेतून आज या खळद पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने जलाभिषेक केला.परंपरेनुसार या यात्रेसाठी २५ मार्च रोजी रामनवमीला प्रस्थानानंतर कावड कोळविहिरे, जोगवडी, मेहता फार्म, वडगाव कॅनॉल, जिंती, फलटण, निंबळक नाका असा तीन दिवसांचा प्रवास करून २८ मार्च रोजी पहाटे रणखिळा येथे पोहोचली. येथे मानाची सवईची हालगी, गुणावरे वाटाड्याच्या कावडीचा सहभाग घेऊन कोथळेत सर्व लवाजम्यासह विसाव्यासाठी थांबली. या वेळी कावडीसोबत पायी वारीत न आलेले पंचक्रोशीतील हजारो भाविकही येथे दाखल झाले. येथे पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने भंडाऱ्याचा कार्यक्रम पार पडला.कोथळे येथे प्रशासनाच्या वतीने अनेक मान्यवरांनी स्वागत केले. या वेळी नानासाहेब तेली महाराज (इस्लामपूर) यांच्यासह लहानमोठ्या काठ्या कावडी, शिर्सुफळ, शेटफळगडे, सणसर, माळेगाव, काटेवाडी, शिवभक्त मंडळी गोडाळा, रामहरिकृष्ण व्यवहारे, दगडू चव्हाण, ढेकळेवाडी कावडींच्या भेटी झाल्या.दुपारी तीनच्या सुमारास ढोलताशा, लेझीम, वाजंत्री यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणुकीने कावडीने येथून पुढे तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुंगी घाटाच्या दिशेने प्रयाण केले. सायंकाळी ५ पर्यंत कावड मुंगी घाटाच्या पायथ्याला आली. तेथे महाआरती करून शंभोच्या नावाचा महागजर झाला व भक्तिमय वातावरणात कावडीची अवघड अशी मुंगी घाटाची चढण सुरू झाली.यावेळी नभात ऊनसावलीचा खेळ, निवृत्तीमहाराज खळदकर व मागे वाजंत्र्यांच्या, डफडीच्या ठेक्यावर बिगरदोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने होणारी कावडीची चढण हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. या वेळी हा सोहळा आपल्या डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविक डोंगरमाथ्यावर गर्दी करून बसले होते. येथून घाटातील माणसे अगदी मुगीसारखी दिसत असल्याचा प्रत्यय येत होता. सायंकाळी ६.४० वाजता एक-एक टप्पा पार करीत कावड घाटमाथ्यावर आली. येथे पोलीस व प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.