तळेघर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या सोमवारी पावणे दोन लाख भाविकांनी हर हर महादेव जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जयच्या गर्जनेत पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. चौथ्या सोमवारी व शनिवार, रविवार या दिवशी भीमाशंकरला सुमारे सहा लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. या दोन दिवसात संपूर्ण रात्रभर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहनांची रांग लांब लागली होती दर्शन बारीची रांग मंदिरापासून दिड किलोमीटर एम.टी टी सी पार्किंग पर्यंत होती. भाविकांना दर्शन घेण्यासाठी सुमारे चार ते पाच तास लागत होते.
भीमाशंकर येथे व्ही आय पी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण येत होता. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे मंचर भीमाशंकर रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे येणार्या भक्तांना धक्केबुक्के खात दर्शनासाठी जावे लागले. भीमाशंकर परिसरामध्ये दाट धुके, बोचरी थंडी व मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सौंदर्य फुलले आहे. यामुळे भीमाशंकरला येणारे भाविक पर्यटक हे सातमाळी घाट तसेच ठिकठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद लुटत होते. भाविकांना बसस्थानकापर्यंत जा-ये करण्यासाठी एस.टी च्या १६ मिनीबस व ३२ मोठ्या बस व पी एम पी एल च्या १२ बसेस ठेवण्यात आल्या आहेत.