भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्तानं गाभा-यात व सभामंडपात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी बंद असल्याने शेवटच्या श्रावणी सोमवारी पायी आलेले व स्थानिक लोक वळगता मंदिर परिसरात फारशी गर्दी नव्हती.
श्रावण महिन्यात भीमाशंकरचे दर्शन पवित्र मानले जात असल्याने पुर्ण एक महिना दर्शनासाठी मोठया संख्येनं भाविक येतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी येवू नये असं आवाहन देवस्थानने केले आहे. मंदिरात रंगबेरंगी अशा फुलांची सजावट करण्यात आली होती. शिवलिंगाबरोबरच मंदिराचं गाभारा फुले, गजरा आणि हाराफुलांनी बहरून गेला होता.
मंदिर बंद असतानाही कोकणातून पायी शिडीघाट, गणेशघाट चढून तसेच भोरगिरी, वांर्दे येथून लोक भीमाशंकरकडे येतात. तसेच एसटी बसनं देखील भाविक भीमाशंकरकडे येतात. मंदिराजवळ आल्यानंतर बंद असल्याने बाहेरूनच दर्शन घेऊन परतावे लागत होते.
शासनाने काही निर्बंध घालून मंदिर सुरू करावे
मागील दोन वर्ष कोरोनामुळे भीमाशंकरमधील बेल - फुल प्रसाद, पेढे, हॉटेल दुकानदाराने पूर्ण बंद आहेत. दरवर्षी श्रावण महिन्यात चांगला व्यवसाय होतो मात्र दोन वर्ष काहीच नाही. त्यामुळे आता उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने काही निर्बंध घालून मंदिर सुरू करावे व थोडे फार व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दयावी अशी मागणी भीमाशंकरच्या दुकानदारांनी केली.