पुणे : पत्रकार भवनमध्ये आयोजित संवाद- स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी केली. या कार्यक्रमात प्रहारचे बच्चू कडू, आमदार अभिमन्यू पवार, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हजर होते. सभागृहात कार्यक्रम सुरू असताना ज्या विद्यार्थ्यांना बसायला जागा मिळाली नाही त्यांनी घोषणा देत हुल्लडबाजी केली.
अर्हम फौंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एकाचवेळी अनेक राजकारणी व्यक्तींना एका व्यासपीठावर बोलावल्याने कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरू असताना शेकडो विद्यार्थी सभागृहाच्या बाहेर उभे होते. गर्दी झाल्याने विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. काही विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम घेण्यामागे राजकीय फायदा असल्याचा आरोप केला.
यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. काही विद्यार्थी सभागृहाचे ग्रील आणि दरवाजे आदळत होते. आयोजकांनी एकाचवेळी एवढे पुढारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी कशाला बोलावले होते? पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही? असे प्रश्न निर्माण होत आहे. गर्दी वाढल्यानंतर आता घटनास्थळी पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आहे.
या कार्यक्रमात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजकीय नेत्यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. लवकरात लवकर त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासनही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आले. सदाभाऊ खोत, अभिमन्यू पवार, गोपीचंद पडळकर आणि बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.