लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया या टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपन्यां विरोधात पुण्यात पहिल्यांदाच नको असलेल्या व्यावसायिक कॉल्ससंदर्भात अतिरिक्त जिल्हा ग्राहक मंच यांच्या कोर्टात दावा दाखल करून घेण्यात आला आहे.
कॅम्प येथील रहिवासी मनमीत सिंग बवारी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे दोन्ही कंपन्यांचे ग्राहक (सिम कार्डधारक) आहेत. २०१७ पासून त्यांनी आपल्या दोन्ही फोन क्रमांकावर ‘डू नॉट डिस्टर्ब’ ही सेवा नोंदणीकृत करून घेतली. तरी नोव्हेंबर २०१८ पासून त्यांना मार्केटिंग करणारे दिवसाला किमान ३-४ कॉल्स (यूसीसी) येऊ लागले. यातील काही कॉल्स रोबोटिक आणि कृत्रिमपणे रेकॉर्ड केलेले असत.
तक्रारदारांनी प्रत्येक कॉलवर पुन्हा फोन न करण्याची विनंती करून, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)च्या नियमांनुसार १९०९ ला आलेल्या प्रत्येक कॉलची तक्रार त्या-त्या टीएसपीच्या पोर्टलला नोंदवली. परंतु त्यांच्या कुठल्याही तक्रारीची दखल न घेता, यूसीसी टेलिकॉलरच्या विरोधात टीएसपीने कारवाई केली नाही. एवढ्या तक्रारी केल्यानंतर आजही तक्रारदारांना यूसीसी कॉल्स येतात. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी अतिरिक्त जिल्हा ग्राहक मंच येथे ॲड. स्वप्निल भालेराव तर्फे दावा दाखल केला.
चौकट
प्रत्येकाला अधिकार
प्रत्येक ग्राहक जो ‘डीएनडी’ची सेवा घेतो त्याला यूसीसी, स्पॅम, रोबोटिक, टेलिमार्केटिंग यांच्या विरोधात ट्रायच्या नियमानुसार टीएसपी यांच्याकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे. आम्ही दोन्ही कंपन्याची मुख्यत: सेवेतील कमतरता व त्यातून होणाऱ्या मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला आहे. नागरिकांनी सायबर गुन्हे, फसव्या योजना व टेलिमार्केटिंगला बळी पडू नये. पहिल्यांदाच असे प्रकरण आल्याने ते दाखल करून घ्यावे, असे ॲॅड. भालेराव यांनी तक्रारदारातर्फे सांगितले. दोन्ही कंपन्यांनी हजर होऊन आपले लेखी म्हणणे मांडले. कंपन्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणात रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यांच्या विरोधात दावा दाखल करून घेण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला.