लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून आपल्याशी न बोलल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल न्यायालयाने एका तरुणाला एक वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निर्णय दिला.
विकास हरिभाऊ जाधव असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना ऑक्टोबर २०१७ मध्ये घडली होती. विकास जाधव हा एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग करुन तिला बोलण्याची सक्ती करीत होता. तसेच तिला मोबाईल देऊ करत होता. त्यावर बोलली नाहीस तर जिवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. त्याच्या नातेवाईकांना ही बाब सांगितल्यानंतरही त्याने हा प्रकार सुरु ठेवला होता.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. अरुंधती ब्रम्हे यांनी ५ साक्षीदार तपासले. आरोपीतर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला होता. शिरुर पोलीस ठाण्याचे तपासी अंमलदार बी. बी. पाटील यांनी अॅड. ब्रम्हे यांना न्यायालयीन कामकाजात सहाय्य केले.