पुणे : एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा पाठलाग करणे, तसेच फोनवर बोलून त्रास दिल्या प्रकरणाचा निकाल अवघ्या तीनच दिवसात लागला आहे. चंदननगर पोलिसांनी दोन दिवसात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी शिक्षा सुनावली. विनयभंग आणि धमकावणेच्या कलमानुसार ७ दिवसांची कैद आणि २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास दोन दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. ५ ऑगस्ट रोजी निकाल झाला.
अमोल नानाजी कांबळे (रा. थिटे वस्ती, खराडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे योगेश कदम यांनी काम पाहिले. पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामासाठी कोर्ट अंमलदार हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली. घटना घडलेल्या दिवशी म्हणजे २ ऑगस्ट रोजी त्याला तत्काळ अटक करण्यात आली. ३ ऑगस्ट रोजी त्याची रवानगी कारागृहात झाली. ४८ तासांच्या आत म्हणजे ४ ऑगस्ट रोजी दोषारोपपत्र दाखल झाले, तर ७२ तासांच्या आत म्हणजे ५ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात आली.