लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केसनंद फाटा येथील एमआयडीसीमधील सेन्सरटेक या कंपनीत काम करणा-या तरुणींकडे अश्लील नजरेने पाहून व बोलून त्यांचा विनयभंग करणा-या व अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न करणा-याला विरोध केल्यानंतर पिस्तूल असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजीद जावेद शेख (वय ४०, रा. लोहगाव), कॉन्ट्रॅक्टर अमित जाधव, कंपनीचा मनुष्यबळ विभागातील सतीश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वाघोली येथे राहणा-या एका तरुणीने लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान घडला. फिर्यादी या त्यांच्या मैत्रिणीसोबत काम करत असताना आरोपींनी संगनमत करून वेळोवेळी फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणी यांच्याकडे वाईट वासनेने पाहून अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न करत होते. त्याला फिर्यादीने विरोध केला. तेव्हा आरोपीने माझ्याकडे बंदूक आहे. तुला संपवायला वेळ लागणार नाही, अशी धमकी दिली व त्यांचा विनयभंग केला. त्यांच्या अत्याचाराला कंटाळून तरुणीने शेवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.