पुणे : चप्पल घेऊन देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षाच्या मुलाशी अनैसर्गिक संभोग करणाऱ्या एका तरुणाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि २०हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे, तर दंड भरल्यास ती रक्कम पीडित मुलाला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
विशेष न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी हा निकाल दिला. अब्दुल रहेमान युनूस सय्यद (वय १९, रा. पिंपरी) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित मुलाच्या आजोबाने याबाबत पिंपरी पोलिसात फिर्याद दिली होती. ३ फेब्रुवारी २०१३ रोजी पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला होता. सय्यद पीडित मुलाला मित्राने कोणत्या दुकानातून चप्पल घेतली, हे दाखविण्यासाठी घेऊन गेला. त्याला नवीन चप्पल घेऊन देण्याच्या बहाण्याने दुकानाच्या आतील बाजूस असलेल्या खोलीमध्ये नेऊन त्याच्याबरोबर अनैसर्गिक संभोग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील सुनील हांडे यांनी केली. त्यानुसार भारतीय दंड संहिता ३७७ (अनैसर्गिक कृत्य) नुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, कलम ३४२ नुसार (अन्यायाने कैदेत ठेवणे) सहा महिने सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम चार नुसार दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. सुनील हांडे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. पीडित मुलाची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा यामध्ये महत्त्वाचा ठरला.