पुणे : येरवडा परिसरातील दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्ध करुन त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या वर्षात आतापर्यंत ८ गुन्हेगारांना एम.पी.डी.ए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे.
निलेश ऊर्फ पिन्या संजय साळवे (वय २०, रा. यशवंतनगर, येरवडा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. कोयता, चाकू, तलवार यासारखी हत्यारे घेऊन तो साथीदारांसह येरवडा परिसरात दहशतवाद माजवत होता. गेल्या एक वर्षात त्याविरुद्ध हत्यारे बाळगणे, दुखापत करणे, जबरी चोरी यासारखे ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये फरक पडला नाही. त्याच्या दहशतीमुळे कोणीही नागरिक तक्रार देण्यासाठी धजावत नव्हते.
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन निलेश साळवे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्याला मंगळवारी सकाळी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.