गेल्या काही वर्षांत सोयीचे म्हणून नॉनस्टिक सर्रास वापरले जाऊ लागले. परंतु नॉनस्टिक भांड्यामध्ये वापरले जाणारे केमिकल कोटिंग्ज आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. विशेषत: ही भांडी अधिक तापल्यावर किंवा जुनी झाल्यावर (कोटिंग निघू लागते) काही विशिष्ट केमिकल्स धुरामध्ये तसेच पदार्थामध्ये उतरू शकतात. अधिक प्रमाणात अधिक काळासाठी घेतली गेल्यास ही केमिकल्स आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
यासाठी एक उत्तम उपाय. लोखंडी कढई-तवा आणि बीडाचा तवा. म्हणूनच बऱ्याच लोकांनी व ३४१ल्ल घेऊन पुन्हा लोखंड आणि बिडाचा वापर सुरू केलेला दिसतो.
बीडाचा नवीन तवा आणल्यावर वापरायच्या आधी स्वच्छ करून तेल लावून ठेवून द्या. थोडा बारीक चिरलेला कांदा भाजा. असं एक दोन दिवस करा. नंतर मसाला वगैरे भाजायला वापरा. जेवढे अधिक वापराल तेवढे रुळत जातात. हळूहळू त्यात तेल मुरेल आणि मग डोसे उत्तपे धिरडी अंबोळी सगळं न चिकटता होऊ लागेल. कायम वापरात ठेवा. असा वापरात ठेवला की मग तेल हळूहळू कमी लागायला लागतं. हा तवा जाडजूड असल्याने पटकन पदार्थ जळत नाहीत आणि एकदा गरम झाला की अधिक काळ गरम राहतो होतो. त्यामुळे इंधन वाचते आणि एकसारखं भाजणे जाणे पण सोपे होऊन जाते.
लोखंडी कढई किंवा ताव्याचा वापर केल्याचा आणखी एक फायदा म्हणजे; लोखंडी कढई-तव्यामध्ये केलेल्या पदार्थात लोह नक्कीच उतरते. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आपल्याकडे अधिक प्रमाणात आढळतो. त्यामुळे दिवसात एखादा पदार्थ बनवण्यासाठी तरी लोखंडी कढई नक्की वापरू शकतो. जेणे करून काही कारणांनी खाण्यातून आवश्यक लोह कमी प्रमाणात मिळत असेल तर ती कमी भरून काढायला मदत होईल. मात्र हे करताना काळजी घ्यायची, पदार्थ तयार झाल्यावर दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचा. आंबट पदार्थ शिजवताना मात्र काळजी घ्या. त्यात लोखंड खूप पटकन आणि थोडं जास्त उतरतं आणि मग चव आणि रंग बदलू शकते.
लोखंडी भांडी वापरण्यात येणारी अडचण म्हणजे गंज. त्यासाठी पण अतिशय सोपा उपाय. घासून झालं की एकदम कोरडं करून ठेवायचं. दररोजच्या वापरला एवढं पुरेसे आहे.
पदार्थ बनवण्यासाठी योग्य ती भांडी वापरली गेली तर, पोषणमूल्य टिकवून ठेवायला किंवा वाढायला देखील मदत होऊ शकते.
- कस्तुरी भोसले