पुणे : समरसतेशिवाय समता शक्य नाही. त्यासाठी बंधुभाव आवश्यक आहे. समाजात आपल्यापेक्षा मागे राहिलेल्यांना वर घेण्यासाठी थोडे झुकावे लागते, तेव्हाच समाजात समरसता निर्माण होते. समरसता हा भाषणाचा विषय नाही तर तो आपल्या कृतीतून घडवून आणण्याचा भाग आहे. आपल्या प्राचीन विचार परंपरेत एकरसतेचा भाव आहे. त्याच्या आधारे देशाचा विकास करण्यासाठी सामाजिक समरसता साधायची आहे, असे प्रतिपादव सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, चिंतक आणि भारतीय मजदूर संघाचे संस्थापक महामंत्री दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित ‘दत्तोपंत ठेंगडी यांच्या दृष्टीतून सामाजिक समरसता’ या व्याख्यानात डॉ. भागवत बोलत होते. अध्यक्षस्थानी समारोह समितीचे राष्ट्रीय सदस्य गोविंददेव गिरी महाराज होते. समितीचे संयोजक रवींद्र देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.डॉ. भागवत म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांचे समरसतेच्या संदर्भातील सर्व विचार दत्तोपंत ठेंगडी यांनी आत्मसात केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचा निकटचा सहवास होता. या महनीय व्यक्तींचा सहवास व व्यासंगाने दत्तोपंत ठेंगडी यांची तयार झालेली व्यापक दृष्टी ही परंपरेशी अनुरूप होती आणि तीच दृष्टी संघाचीही आहे. समाजात जर उच्च-नीचता असेल तर देश उभा राहू शकत नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते आणि हे मत ते आग्रहाने मांडायचे. त्यांचा दृष्टीकोन प्रामाणिक होता, त्यामागे कोणतेही राजकीय आडाखे नव्हते.'दत्तोपंत ठेंगडी यांचे विचार अतिशय मूलगामी होते. त्यांच्या साहित्यात ऋषीची प्रज्ञा दिसून येते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अपवाद करता असा अनुभव अन्य कोणाच्या विचारात मला अनुभवास आला नाही. - गोविंददेव गिरी महाराज