चाकण : माघ शुद्ध दशमी व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस याचे औचित्य साधून वसंत पंचमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे मागील 66 वर्षांपासून सुरु असणा-या अखंड हरीनाम सप्ताहास सोमवारपासून उत्साहात सुरुवात झाली.
अखंड हरीनाम सप्ताहास व गाथा पारायण सोहळ्याच्या सुरुवातीला सोमवारी मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुख्मिणी व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तींना अभिषेक घालून महापूजा करण्यात आली. याप्रसंगी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, प्रा. मनोज मते, प्रवीण झेंडे तसेच इंदोरी, सुदवडी, येलवाडी, जांबवडे, सांगुर्डी या गावचे सरपंच व सदस्य, दशमी सोहळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अखंड गाथा पारायण सोहळ्यामध्ये दि. 22 ते 29 जानेवारी 2018 याकाळात रोज रात्री नऊ वाजता हभप माऊलीमहाराज कदम, हभप जयवंत महाराज बोधले, हभप आसाराम महाराज बढे, हभप मदन महाराज गोसावी, हभप प्रमोद महाराज जगताप, हभप चैतन्य महाराज देगलूरकर, हभप उद्धव महाराज मंडलिक यांची कीर्तन सेवा होणार आहे. सोमवार (दि. 29) रोजी भागवताचार्य हभप विकासानंद महाराज मिसळ यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
‘माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार | केला अंगिकार तुका म्हणे ||’ या महाराजांच्या अभंग प्रमाणानुसार माघ शुद्ध दशमी या तिथीला वारकरी संप्रदायामध्ये मोठे महत्व आहे. या अखंड हरीनाम सोहळ्यासाठी महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर या सोहळ्यात सहभागी होतात.
भंडारा डोंगरावर भव्य मंदिर निर्माणाचे काम मागील वर्षीपासून सुरू झाले आहे. याच पायाभरणीच्या जागी भव्य मंडप उभारण्यात आला असून मंदिराच्या पायाभरणी झालेल्या जागी हा सोहळा यावर्षी व्हावा व या निमित्ताने गाथा पारायणाच्या माध्यमातून ज्ञानयज्ञ घडावा अशी दशमी सोहळा समितीच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना होती. या भव्य-दिव्य मंदिर निर्माणाच्या सुरू असलेल्या कामामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे याची प्रचीती पारायणाच्या पहिल्याच दिवशी भाविक वाचकांनी तुडुंब केली.
पहिल्या दिवशी गाथा पारायणासाठी सुमारे पाच हजार भाविकांनी गाथा पारायणाचे वाचन केले. गाथा पारायण सोहळयाचे नेतृत्व जालना जिल्ह्यातील वाकाळणी येथील संत विद्यापीठाचे प्रमुख, गुरुवर्य, गाथामूर्ती, हभप नानामहाराज तावरे हे करीत आहेत. महाराजांच्या रसाळ व नादब्रम्ह गायनशैलीमुळे सामुहिक गाथा पारायनातून डोंगरावर चैतन्याची अनुभूती येत आहे.
पहिल्या दिवशी सायंकाळी पाच ते सात दरम्यान भागवताचार्य, विद्यावाचस्पती हभप विकासानंद महाराज मिसाळ यांचे ज्ञानेश्वरीवर भाव निरुपण झाले. रात्री नऊ वाजता श्री क्षेत्र आळंदी येथील हभप माऊलीमहाराज कदम यांची कीर्तन सेवा झाली. जगद्गुरू श्री संत तुकोबारायांचे शिष्य संत निळोबारायांच्या ‘आपणची ते येती घरा | देखोनी बरा निजभाव || निळा म्हणे लावू सेवे| आपुल्या वैभवे गौरविती||’ या अभंगावर महाराजांनी रसाळ वाणीतून अगदी सोप्या शब्दांमध्ये निरुपण केले. पिंपरी-चिंचवड, हवेली, मावळ, मुळशी, खेड तालुक्यातील भाविकांनी कीर्तनासाठी मोठी गर्दी केली होती.