इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा "हरणेश्वर अॅग्रो हा प्रकल्प गेली १३ वर्षे पासून बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा कारखाना राजकारणाचा बळी ठरला आहे
कर्जाचा मोठा डोंगर झाल्याने न्यायालयीन प्रकियेनुसार २० एप्रिल रोजी कारखान्याचा लिलाव होणार आहे.
कळस येथील माळरानावर १९९९ साली भाजपाचे नेते बाबासाहेब चवरे यांनी सुमारे २०९ एकर क्षेत्रावर या कारखान्याची भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी केली. पुढे २००५ साली सुरु झालेल्या या कारखान्यामधून शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती,व उसापासून गूळ पावडर,निर्मिती करण्यास सुरवात झाली. उजनी जलाशयावरून यासाठी पाईपलाइन करून पाणीही आणण्यात आले. याठिकाणी कामगारांसाठी वसाहतही उभी करण्यात आली, मात्र राजकीय षडयंत्र व प्रशासकीय उदासीनता यामुळे उसापासून साखर निर्मिती साठी या कारखान्याला आघाडी सरकारच्या काळात अंतराची अट दाखवून परवाना नाकारण्यात आला. शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती,व उसापासून गूळ पावडर,यावर ह्या कारखान्याची आर्थिक गणिते कोलमडली. या प्रकल्पासाठी येथील शेतकऱ्यांनी आपली जमीन शेअर्स रुपी मोबदल्यात कारखान्याला दिली, मात्र २००९ नंतर हा प्रकल्प गेली १३ वर्षे बंदच आहे, कारखान्यावर अनेक बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले आहे त्यामुळे कारखाना डबघाईला आला आहे, तडजोडीअंतर्गत सुमारे २५ कोटी रुपयांचे अनेक बँकाचे कर्ज आहे.यामधील ४ कोटी रूपये भरले असल्याचा दावा व्यावस्थापनाने केला आहे. मात्र कर्ज असलेल्या बँकानी न्याय प्रकियेनुसार २० एप्रिल रोजी कारखान्याचा लिलाव जाहीर केला आहे. कारखान्याची स्थावर व मशनिरी अशी सुमारे ४५ कोटी रूपयांची मालमत्ता आहे मात्र लिलाव झाल्यास मोठे नुकसान होणार आहे.
इंदापूर, बारामती, दौंड फलटण ,पुरंदर येथील सुमारे बारा हजार सभासदांनीं आपले शेअर्स जमा केले होते त्यांचेही नुकसान झाले आहे .
कारखान्यावर बँकाचे कर्ज असल्याने २० एप्रिल रोजी लिलाव घोषीत केला आहे मात्र कोविडमुळे असा निर्णय घेता येत नाही आम्ही वकिलामार्फत आमची बाजु मांडली आहे यामध्ये मोठे राजकारण आहे मात्र आम्ही कायद्याच्या आधारे लढुन याठिकाणी प्रकल्प सुरु करणयासाठी प्रयत्नशील आहोत.
माऊली चवरे ,संचालक