मंचर : चारित्र्यावर संशय आणि नवीन घर घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत यासाठी मंचर येथील विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण, शिवीगाळ,दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी विवाहितेचा पती,सासू, सासरे ,नणंद यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पती प्रशांत प्रकाश डमरे,सासू मालन प्रकाश डमरे, सासरे प्रकाश मारुती डमरे ,नणंद सुवर्णा राहुल वाला अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; फिर्यादी कीर्ती प्रशांत डमरे यांचा २००७ मध्ये प्रशांत प्रकाश डमरे (रा.मुंबई) याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर सहा महिन्यांनी पती दारू पिऊ लागल्याने त्यांना समजले की पतीला दारुचे व्यसन आहे. याबाबत तिने सासू-सासरे नणंद यांना सांगितले असता तुझा नवरा तुला सांभाळता येत नाही, त्यात आम्ही काही सांगणार असे म्हणत दुर्लक्ष केले. त्यानंतर प्रशांत डमरे यांनी वारंवार दारू पिऊन विवाहितेस मारहाण केली. त्यानंतर त्यांना दोन मुले झाल्यानंतरही मारहाण सुरूच होती. तसेच आईकडून रेशनिंगसाठी पैसे घेऊन ये या कारणावरून उपाशीपोटी ठेवल्याने विवाहिता ही आपल्या माहेरी मंचर येथे आली होती. त्यानंतर २४ मे २०१८ रोजी विवाहितेचे चुलते व भाऊ यांच्या मध्यस्थीने वकिलामार्फत त्रास देणार नाही अशी तिच्या पतीने नोटरी करून देत तिला पुन्हा घरी नेले. मात्र, घरी गेल्यानंतरही काही दिवसांनी पतीला व्यसन लागल्याने त्याच्याकडून वारंवार त्रास व मारहाण केली जात होती. याचवेळी पती विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत होत. याबाबत तिने सायन पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली होती.त्यानंतरही तिला वारंवार त्रास देण्यात आला.या छळाला कंटाळून ७ जून २०२१ रोजी दोन्ही मुलांना घेऊन माहेरी मंचर येथे निघून आली.
यानंतर पतीने तिला फोन करून तू घरी ये, नाहीतर मी फाशी घेईल असे म्हणत धमकी व शिवीगाळ केली. या वारंवारच्या त्रासाला कंटाळून कीर्ती डमरे यांनी पती प्रशांत प्रकाश डमरे,सासू मालन प्रकाश डमरे, सासरा प्रकाश मारुती डमरे ,नणंद सुवर्णा राहुल वाला यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.