इंदापूर : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची आज (दि.१६) बिनविरोध निवड करण्यात आली. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची सन २०२४ - २९ ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नवी दिल्लीत आज पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांच्या नावावर बिनविरोध शिक्कामोर्तब झाले. त्यांची बिनविरोध निवड हा शरद पवारांना धक्का मानला जात आहे. हर्षवर्धन पाटील हे देशातील व राज्यातील सहकारी साखर कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक दशके सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी राज्यात महत्वाचे समजले जाणारे सहकार खात्याचे मंत्रीपद सुमारे नऊ वर्षे समर्थपणे सांभाळले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना या दोन्ही महासंघाचे वरिष्ठ संचालक म्हणून अनेक वर्षे काम करताना त्यांनी साखर कारखाना क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले आहे. शेतकरी व देशातील साखर उद्योगांच्या अडचणी व समस्या ह्या केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे मांडून त्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला आहे. दरम्यान,देशपातळीवरील साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. देश व राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या गुणवत्तावाढी बरोबरच त्यांच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही निवडीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 1:34 PM